धुळे : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या भारत निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेची मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली आहे. याबाबत सर्वांनी माहिती करुन घ्यावी व या तत्वांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले.
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी विविध नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्याचबरोबर निवडणूक निरपेक्षपणे पार पडण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्वपूर्ण असल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नितिन गावंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, उपजिल्हाधिकारी संजय बागडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा कोषागार अधिकारी प्रविण पंडीत, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी स्वराजंली पिंगळे, महानगरपालिकेचे लेखाधिकारी गजानन पाटील यांच्यासह प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी गोयल म्हणले की, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी खर्च निरीक्षकांना वेळोवेळी माहिती देण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांनी आपसात समन्वय राखून माहिती द्यावी. त्याचबरोबर सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच माध्यम प्रतिनिधींनी आदर्श आचारसंहितेची माहिती करुन घ्यावी व त्याचे तंतोतंत पालन करावे. निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही यासाठी प्रयत्नशील रहावे. निवडणूक प्रक्रियेत माध्यमांची महत्वपूर्ण भूमिका असल्याने निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडणे, मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी नागरीकांमध्ये जागृती करणे, मतदान प्रक्रिया निरपेक्षपणे पार पडावी यासाठी नागरीकांचा सहभाग वाढण्यासाठी सहकार्य करावे तसेच पेड न्युजबाबत आयोगाची मार्गदर्शक तत्वे जाणून घेण्याचे आवाहन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गावंडे यांनी आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्वांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी स्वराजंली पिंगळे यांनी खर्च व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. उपस्थितांचे आभार जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी मानले. या प्रशिक्षणास जिल्ह्यातील विविध माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :
- नांदेड : पोलीस महिलेच्या लिंग परिवर्तनाला गृहविभागाची परवानगी; मराठवाड्यातील दुसरी घटना
- Pulkit Samrat-Kriti Kharbanda : पुलकित-क्रितीची लग्नपत्रिका संगीत थीमवर
- Murder Mubarak : पंकज त्रिपाठीच्या ‘मर्डर मुबारक’ चा ट्रेलर पाहिला का?
The post आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्वांची माहिती करुन घ्यावी : जिल्हाधिकारी अभिनव गोयल appeared first on पुढारी.