नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आरक्षणासह मराठा समाजाच्या विविध मुद्यांवर भूमिका मांडण्यासाठी नाशिक लोकसभा निवडणूक रिंगणातील मराठा उमेदवारांना एका व्यासपीठावर आणण्याचा ठराव सकल मराठा समाजाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. यासाठी जिल्हा समन्वय समिती गठीत करण्यात येत असून, या समितीच्या माध्यमातून मराठा उमेदवारांना पत्र दिले जाणार आहे.
नाशिकच्या शिवतीर्थावर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या नेत्यांची बैठक पार पडली. ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत बनकर, प्रा. हरीश आडके, उपोषणकर्ते नाना बच्छाव यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी करणाऱ्या मराठा उमेदवाराला सकल मराठा समाजाच्या वतीने पत्र सादर करून ओबीसीतून मराठा आरक्षण, सगेसोयरे अधिसूचनेची कुठलीही कारणे न देता ठोस अंमलबजावणी करणे, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावरील एसआयटी, मराठा आंदोलकावर दाखल केसेस, अंतरवेलीत मराठा समाजावर लाठीचार्ज,या बाबतीत काय भूमिका घेणार याबाबत विचारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्या, मराठा युवक आत्महत्या यांच्या निराधार झालेल्या कुटुंबाची विवंचना उपेक्षा, तसेच अन्य विषयावर याबाबतीत मराठा उमेदवारांनी आपली भूमिका समाजासमोर मांडावी यासाठी त्यांना एका व्यासपीठावर आणण्याचा ठराव करण्यात आला. यासाठी तीन दिवसांत जिल्हा समन्वय समिती जाहीर करून पुढील प्रयोजन होईल, असे ठरविण्यात आले. यावेळी प्रचार प्रमुख राम खुर्दळ, योगेश नाटकर पाटील, श्रीराम निकम, विकी गायधनी, ज्ञानेश्वर सुरासे, सागर वाबळे, अॅड. गौरव गाजरे, अण्णा पिंपळे, मंगेश पाटील, आदी यावेळी उपस्थित होते.
एक संस्था, एक संघटना, एक प्रतिनिधी
मराठा समाज संघटित राहावा, सर्वांशी संवाद व्हावा, व्यवस्थापन सुनियोजित असावे व समाजाच्या भूमिका जिल्हाभर नेण्यासाठी सकल मराठा समाज समन्वय समितीच्या रचणेसाठी चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील मराठा समाजाच्या संस्था, संघटनाची ‘एक संस्था, एक संघटना एक प्रतिनिधी’ अशी रचना करण्यात येणार आहे. त्याची यादी तयार करण्याचे काम सुरळीत व्हावे यादृष्टीने बैठकीत चर्चा झाली. यासाठी मराठा संस्था, संघटनानी तातडीने नाना बच्छाव यांना आपला एक प्रतिनिधी, त्याचा फोन, संघटना संस्था नाव व्हाॅटस्अॅपला कळवावे, सोबत आधार कार्ड, पॅनकार्ड झेरॉक्स व एक फोटो आणून द्यावा, असा निर्णय झाला.
आरक्षणासह मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात लोकसभा निवडणुकीतील मराठा उमेदवाराची भूमिका समाजासमोर येणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्व मराठा उमेदवारांना एका व्यासपीठावर आणण्याचा व त्यासाठी जिल्हा समन्वय समिती गठीत करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.
– नाना बच्छाव, उपोषणकर्ते, सकल मराठा समाज.
हेही वाचा –