लाल कांदा उत्पादकांवर सरकारकडून अन्याय, शेतकरी संतप्त

सफेद कांदा

मनमाड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी लाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मात्र निराशा झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने केवळ पांढऱ्या कांद्यासाठीच निर्यात खुली का केली? लाल कांद्यासाठी का नाही? असे प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केले असून, उन्हाळ कांद्यावरील निर्यातबंदी उठवून न्याय देण्याची मागणी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकाने 8 डिसेंबर ते 31 मार्चपर्यंत कांद्याची निर्यातबंदी केली होती. त्यामुळे कांद्याच्या भावात मोठी घसरण होऊन कांद्याला कवडीमोल भाव मिळत होता. 31 मार्चनंतर निर्यात खुली होऊन कांद्याला चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने पुढील आदेश येईपर्यंत निर्यातबंदी कायम ठेवली. परिणामी, शेतकरी हवालदिल झाले आहेत. एकीकडे निर्यातबंदीमुळे कांद्याला योग्य भाव मिळत नसताना दुसरीकडे हमाली, तोलाई कपात करण्यावरून माथाडी आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी लिलावात भाग ने घेण्याचा निर्णय घेऊन एका प्रकारे अघोषित संप सुरू केला. त्याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसत असून, वाढत्या तापमानामुळे साठवून ठेवलेला कांदा खराब होऊ लागल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने पांढरा कांद्यासाठी निर्यात खुली करून आमच्यासारख्या लाल कांदा उत्पादकाच्या जखमेवर एका प्रकारे मीठ चोळण्याचे काम केल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे पांढऱ्या कांद्यासोबत लाल कांद्यासाठीदेखील निर्यात खुली करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

गुजरातमध्ये पांढऱ्या कांद्याचे सर्वाधिक उत्पादन

पांढऱ्या कांद्याचे गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. नाशिक जिल्ह्यात अगदी मोजक्याच भागात या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यात लाल कांदा पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जिल्ह्यात पांढरा कांदा पिकविणाऱ्या बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असून, लाल कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांवर मात्र अन्याय झाला आहे.

हेही वाचा –