पहिल्या दिवशी तीन अर्ज दाखल; नाशिकमधून ८७, दिंडाेरीतून ४० अर्ज विक्री

लोकसभा निवडणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील शुक्रवारी (दि.२६) नामनिर्देशन पत्र भरण्यास प्रारंभ झाला आहे. दोन्ही मतदारसंघांतून एकूण तीन उमेदवारांनी प्रशासनाकडे अर्ज सादर केले. तसेच दिवसभरात नाशिकमधून ८७ व दिंडोरीतून ४० अर्जांची विक्री झाली. शनिवारी (दि. २७) तसेच रविवारी (दि.२८) सार्वजनिक सुट्टी असल्याने यादिवशी अर्ज विक्री व दाखल करायची प्रक्रिया थंडावणार आहे. इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी ३ मेपर्यंतची मुदत असणार आहे.

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात २० मे रोजी नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दोन्ही मतदारसंघांत अर्ज विक्री दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नाशिक मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या दालनात अर्ज भरले जात आहे. अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्याकडे दिंडोरी मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार नाशिकमधून पहिल्या दिवशी शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवाराने अर्ज भरला आहे. तसेच दिंडोरीमधून कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (मार्क्सवादी) पक्षाकडून जे. पी. गावित आणि सुभाष चाैधरी यांचे अर्ज दाखल झाल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत एकीकडे तीन अर्ज दाखल झाले असताना अर्ज विक्रीलादेखील चांगला प्रतिसाद लाभला. नाशिक लोकसभा मतदारसंघातून ४७ इच्छुक उमेदवारांनी ८७ अर्जाची खरेदी केली. तर दिंडाेरीतून १७ उमेदवार ४७ अर्ज घेऊन गेले आहेत. उमेदवारांच्या सुविधेसाठी दोन्ही निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात विशेष कक्ष तयार करण्यात आले आहे. त्यात अर्ज विक्री, अर्ज तपासणी, अनामत रक्कम भरून घेणे आदी कक्षांचा समावेश आहे.

नाशिकमध्ये प्रमुखांनी नेले अर्ज

नाशिक लोकसभा मतदारसंघातून ८७ अर्जांची पहिल्या दिवशी विक्री झाली. विद्यमान खासदार हेमंत गोडसे, दिलीप खैरे, पराग वाजे, करण गायकर, विलास शिंदे, जितेंद्र भाभे, दशरथ पाटील, दिनकर पाटील, सिद्धेश्वरानंद सरस्वती, स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती तसेच भक्ती गोडसे आदी प्रमुखांनी अर्ज नेले.

दिंडाेरीत इच्छुकांकडून अर्ज खरेदी

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून इच्छुकांनी पहिल्याच दिवशी ४७ अर्ज नेले. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, भास्कर भगरे, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण, पल्लवी भगरे आदींचा समावेश आहे.

पाच जणांनी भरली अनामत रक्कम

दिंडोरी मतदारसंघातून जे. पी. गावित आणि सुभाष चाैधरी यांनी उमेदवारी अर्जासोबत प्रत्येकी १२,५०० रुपयांची अनामत रक्कम भरली. याशिवाय डॉ. भारती पवार व शिवाजी बर्डे यांनीदेखील अनामत रक्कम जमा केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. याशिवाय नाशिक मतदारसंघातून शांतीगिरी महाराज यांनीदेखील अर्जासोबत अनामत रक्कम जमा केली.

पोलिस छावणीचे स्वरूप

निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा घेतला आहे. प्रत्येक गेटवर तसेच कार्यालयाच्या परिसरात पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र पाहून त्यांना आत सोडले जात आहे. तर मुख्यालयात काम घेऊन येणाऱ्या सामान्य जनतेची टपप्याटप्प्यावर चौकशी करून त्यांना प्रवेश दिला जात आहे. एकूणच कार्यालयाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

हेही वाचा –