नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘आविष्कार-2023-24’ राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ संशोधन महोत्सवाचे शुक्रवारपासून (दि.१२) आयोजन करण्यात आले आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विद्यापीठातील शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत दुपारी ४ वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कुलगुरु डॉ. माधुरी कानिटकर यांनी दिली.
डॉ. कानिटकर पुढे म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी आविष्कार संशोधन महोत्सव साकार करण्यात आला आहे. या आंतरविद्यापीठस्तरीय सोळाव्या संशोधन प्रकल्प महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी आरोग्य विद्यापीठाकडे आहे. संशोधन महोत्सवात राज्यातील 24 विद्यापीठांमधून अंदाजे दीड हजार विद्यार्थी व शिक्षक उपस्थित राहणार आहेत. तसेच सुमारे 950 पेक्षा अधिक विद्यार्थी या संशोधन प्रदर्शनात सहभाग नोंदविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आविष्कार महोत्सवाच्या अनुषंगाने अधिक माहितीसाठी विद्यार्थी व शिक्षकांनी विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण विभागाचा दूरध्वनी क्र. 0253-2539173 किंवा 2539174 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सहा संवर्गात मुल्यमापन
संशोधन महोत्सवामध्ये मानव्यविद्या, भाषा व ललीतकला; वाणिज्य, व्यवस्थापन व विधी; विज्ञान; शेती आणि पशुसंवर्धन; अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच वैद्यक व औषध निर्माणशास्त्र हे सहा संवर्ग आहेत. या संवर्गामध्ये संशोधन प्रकल्प व सादरीकरण होणार असल्याचे प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले.
हेही वाचा :
- Nashik News : युवा महोत्सवासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष
- Thane : कल्याण-डोंबिवलीतील 700 प्रकल्प बाधितांची प्रकरणे लवकरच निकाली
The post आरोग्य विद्यापीठात उद्यापासून अविष्कार महोत्सव appeared first on पुढारी.