युवा महोत्सवासाठी शाळांना ‘टार्गेट’

राष्ट्रीय युवा महोत्सव www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. १२) होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात गर्दी जमविण्यासाठी जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना विद्यार्थी टार्गेट देण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी किमान १०० ते दीडशे विद्यार्थी आणावे, असा तोंडी फतवाच बजावण्यात आला. त्यामुळे शाळा-महाविद्यालये झाडून कामाला लागले आहे.

देशात यंदा राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजनाची सुवर्णसंधी नाशिकला लाभली आहे. पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते या महोत्सवाचे उद‌्घाटन पार पडणार आहे. उद‌्घाटनाच्या प्रमुख सोहळ्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद रोड) रोडवर मोदींचा रोड-शो आयोजित करण्यात आला आहे. उद‌्घाटनला मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांसह, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच अर्धा डझन मंत्री हजेरी लावणार आहेत. त्यामुळे या भव्यदिव्य सोहळ्याकरीता आयोजकांना किमान १ लाख जनतेची उपस्थिती अपेक्षित आहे. त्यानूसार राज्यातील सत्ताधारी तीन्ही पक्षांनी त्यांचे-त्यांचे प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांना गर्दी जमविण्याचे निर्देश दिले आहे. तसेच प्रामुख्याने हा महोत्सव युवकांचा असल्याने तेथे युवावर्गाची उपस्थिती अनिवार्य आहे. त्यामुळे अधिकची गर्दी जमविण्यासाठी आता शाळा व महाविद्यालयांनाच टार्गेट कळविण्यात आले आहे.

माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विभागाकडून जिल्ह्यातील शासकीय व खासगी शाळांना तोंडी आदेश दिले आहेत. त्यामध्ये कार्यक्रमाच्या दिवशी विद्यार्थी आणण्यास सांगण्यात आले आहे. शाळा-महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या नेण्या-आणण्याची व्यवस्था करावी. त्यांच्याकरीता पिण्याचे पाणी व नाश्ता, सुरक्षाव्यवस्था आदी बाबींची पूर्तता करावी. ४०-५० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक नेमावा, अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे महोत्सव जरी युवा असला तरी शाळा-महाविद्यालयांच्या डोकेदुखीत भर पडली आहे.

नोंदणीसाठी अर्ज

युवा महोत्सव कार्यक्रम महोत्सवासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नोंदणीनूसार शाळांना सुरक्षापासेस वितरीत केले जाणार आहे. टार्गेटचे भुत डोक्यावर असल्याने शाळा-महाविद्यालयांकडून उच्च व तंत्रशिक्षण व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागा कडे विद्यार्थ्यांच्या नावाच्या याद्यांसह नोंदणी अर्ज येऊन पडत आहेत. या याद्यांनुसार पासेस तयार करताना अधिकाऱ्यांच्या दमछाक होत असल्याची खात्रीलायक माहिती मिळते आहे.

हेही वाचा :

The post युवा महोत्सवासाठी शाळांना 'टार्गेट' appeared first on पुढारी.