बनावट पासद्वारे सिटीलिंकची होतेय फसवणूक

सिटीलिंक बस,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; बनावट पास तयार करून काही प्रवासी सिटीलिंकची फसवणूक करीत असल्याचे प्रकार समोर आले आहे. अशा प्रवाशांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय सिटीलिंकने घेतला असून आता पासधारकांकरीता आरएफआयडी कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. दिव्यांग प्रवासी तसेच अन्य सवलतीच्या पासचा लाभ घेणार्‍या प्रवाशांनी सिटीलिंकच्या अधिकृत पास केंद्रावरून आरएफआयडी कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन सिटीलिंक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात सिटीलिंकच्या वतीने नियमित प्रवास करणार्‍या प्रवाश्यांकरिता सवलतीच्या दरात विविध प्रकारच्या पासेसचे वितरण करण्यात येते. सद्यस्थितीत नियमित प्रवास करणार्‍या प्रवाश्यांकरीता सिटीलिंकतर्फे विद्यार्थी पास, विशिष्ट मार्ग पास, ओपेन एंडेड पास तसेच दिव्यांग मोफत पास वितरीत करण्यात येतात. सिटीलिंकच्या स्थापनेपासून सदर पास हे साध्या पद्धतीचे देण्यात येत होते. परंतु नेहमीच प्रवाश्यांना अद्ययावत सेवा देता याव्यात यासाठी सिटीलिंक नेहमीच प्रयत्नशील असते. त्याचाच एक भाग म्हणून सिटीलिंकने साध्या पास ऐवजी आता प्रवाश्यांना आरएफआयडी पास देण्यास सुरुवात केली आहे. १ जानेवारी २०२४ पासून आरएफआयडी पास बंधनकारक करण्यात आलेले आहे. आरएफआयडी म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन. नवीन आरएफआयडी पास मध्ये ईलेक्ट्रोनिक चीप असल्याने बसमध्ये पास आपोआप स्कॅन झाल्यानंतर वाहकाला त्याची माहिती मिळते. दरम्यान, काही प्रवासी बनावट पास तयार करून सिटीलिकंच्या बसेसमधून प्रवास करीत असल्याचे समोर येत आहे. बनावट पासमध्ये इलेक्ट्रोनिक चीप नसल्याने असे पास स्कॅन होत नाही. त्यामुळे अशा प्रवाश्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

प्रवाश्यांनी विनाटिकीट दंडात्मक कारवाई टाळण्याकरिता सिटीलिंककडून प्राप्त अधिकृत आरएफआयडी कार्डच जवळ बाळगणे आवश्यक आहे. १ जानेवारी २०२४ पासून आरएफआयडी पास अनिवार्य करण्यात आल्याने दिव्यांग प्रवासी तसेच अन्य सवलतीच्या पासचा लाभ घेणार्‍या प्रवाश्यांनी सिटीलिंकच्या अधिकृत पास केंद्रावरून आरएफआयडी कार्ड काढून घ्यावे. अन्यथा प्रवाश्यांना सवलतीच्या पासचा लाभ घेता येणार नाही.

– मिलिंद बंड, महाव्यवस्थापक, सिटीलिंक.

हेही वाचा :

The post बनावट पासद्वारे सिटीलिंकची होतेय फसवणूक appeared first on पुढारी.