नाशिक : पुढारी वृत्तसेवा – एकलहरे येथील महापारेषणचे प्रत्येकी ५० मेगावाॅटचे तीन ट्रान्स्फाॅर्मर बंद पडले. त्यामुळे रविवारी (दि. ९) मध्यरात्री दीडपासून नाशिक रोड परिसर, देवळाली, भगूर, शिंदे-पळसे आदी भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. दुरुस्तीच्या कामांसाठी ४८ तासांचा कालावधी लागणार असल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.
महापारेषणच्या एकलहरे येथील उपकेंद्राच्या परिसरात प्रत्येकी ५० मेगावाॅटचे तीन ट्रान्स्फाॅर्मर आहेत. या ट्रान्स्फाॅर्मरवरून महावितरणच्या दसक व मुक्तिधाम येथील ३३/११ केव्हीच्या उपकेंद्राला विद्युतपुरवठा केला जातो. पण यातील एक ट्रान्स्फाॅर्मरवर गुरुवारी (दि.६) वीज कोसळल्याने तो नादुरुस्त झाला. तर रविवारी (दि.९) मध्यरात्री दीडच्या सुमारास उर्वरित दोन्ही ट्रान्स्फाॅर्मरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते बंद पडले. परिणामी, महावितरणच्या दसक येथील केंद्रातून वीजपुरवठा हाेणाऱ्या उपनगर, नाशिक रोड परिसर, भगूर, देवळाली कॅम्प तसेच शिंदे-पळसे या भागातील बत्ती गूल झाली. त्यामुळे अगोदरच उकाड्याने त्रस्त झालेल्या नाशिक रोड-भगूरवासीयांना विजेअभावी रात्र जागून काढावी लागली.
एकलहरे येथील ट्रान्स्फाॅर्मरमध्ये बिघाड झाल्याने नाशिक रोड-देवळाली भागात वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. महापारेषणने दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, त्यासाठी ४८ तास लागू शकतात. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणच्या शहरातील अन्य उपकेंद्रांतून वीज घेत रोटेशन पद्धतीने तिचा पुरवठा केला जातोय. ग्राहकांनी सहकार्य करावे. -दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता, महावितरण, नाशिक परिमंडळ
महापारेषणने तिन्ही ट्रान्स्फाॅर्मर बदलण्याचे काम तातडीने हाती घेतले आहे. परंतु या कामासाठी किमान ४८ तासांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या कालावधीत ग्राहकांना विद्युतपुरवठा करण्याचे आव्हान महावितरणसमोर उभे ठाकले आहे. दरम्यान, तापमान ४२ अंशांवर जाऊन पोहोचले असतानाच महावितरणने मेमध्ये मान्सूनपूर्व कामे हाती घेतली. त्यावेळी सातत्याने वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने सामान्यांना घामाच्या धारा लागत होत्या. आता कुठे वीजपुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीत होत असताना महापारेषणचे एक नव्हे तीन ट्रान्स्फाॅर्मर एकाच वेळी बंद पडले. मान्सूनच्या तोंडावरच उद्भवलेल्या समस्येमुळे वीजपुरवठाच खंडित झाला. त्यामुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
सक्तीचे लोडशेडिंग
महापारेषणचे एकलहरे येथील ट्रान्स्फाॅर्मर बंद पडल्याने त्याचा परिणाम थेट वीजपुरवठ्यावर होत आहे. वीज ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणने त्यांच्या शहरातील अन्य भागांतील उपकेंद्रांमधून नाशिक रोड-देवळाली भागाला वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ग्राहकांना रोटेशन पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना सक्तीच्या लोडशेडिंगला सामोरे जावे लागले.
एकलहरेतील ३ ट्रान्स्फाॅर्मरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने महावितरणला वीजपुरवठ्यात अडथळे येत आहेत. दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे. मंगळवारी (दि.११) सायंकाळपर्यंत वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. – प्रवीण भालेराव, अधीक्षक अभियंता, महापारेषण.
हेही वाचा: