नाशिक : पुढारी वृत्तसेवा – सोलापूर येथे एमडी (मेफेड्रॉन) तयार करण्याचा कारखाना व गोदाम सुरू करणाऱ्या संशयित सनी पगारे व अर्जुल पिवाल गँगच्या दोघांना शहर पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. या दोघांची एमडी बनवण्यात महत्त्वाची भूमिका असल्याचे उघड झाले. एकाने पगारे, पिवाल गँगला एमडी तयार करण्याचा फॉर्म्युला दिला, तर दुसऱ्याने कच्चा माल खरेदीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव केल्याचे समोर येत आहे.
फैयाज अहमदरसूल शेख ऊर्फ भाई (५०, रा. वसई पश्चिम) आणि रमेश नरसिंह आयथा (४३, रा. तेलंगणा) अशी संशयितांची नावे आहेत. यातील फैयाजने कागदपत्रांची जुळवाजुळव केली तर रमेशने एमडीचा फॉर्म्युला इतर दोघांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
सामनगाव येथे पोलिसांनी संशयित गणेश शर्मा यास एमडी साठ्यासह पकडले होते. या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर त्याचे धागेदोरे सोलापूरपर्यंत गेले. अमली पदार्थविरोधी पथकाचे तत्कालीन निरीक्षक दिवाणसिंग वसावे, सहायक निरीक्षक हेमंत नागरे, प्रवीण सूर्यवंशी, हेमंत फड व गुन्हे शाखा युनिट एकचे तत्कालीन निरीक्षक विजय ढमाळ यांनी सनी पगारे व अर्जुल पिवाल गँगचा शोध लावत या गुन्ह्यात त्यांना अटक केली. त्यानंतर पथकांनी सोलापूरमधील एमडीचा कारखाना व गोदाम उद्ध्वस्त केले. या प्रकरणात संशयितांना अटक करून मोक्कांतर्गत कारवाई केली. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास नाशिक रोड विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी हे करीत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी सोलापूर कारागृहातून संशयित फैयाज व रमेश यांचा ताबा घेतला. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर फैयाज याने सनी व अर्जुन यांना एमडीच्या कारखान्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करून दिल्याचे स्पष्ट झाले. तर रमेश याने एमडी बनवण्याचा फॉर्म्युला दिल्याचे उघड झाले. या दोघांची चौकशी झाल्यानंतर त्यांचा ताबा पुन्हा सोलापूर कारागृहात देण्यात आला आहे.
संशयितांची धरपकड
सप्टेंबर २०२३ मध्ये नाशिक रोड पोलिसांनी सामनगाव रस्त्यावरून गणेश शर्माला १२.५ ग्रॅम एमडीसह पकडले. ऑक्टोबरपासून सखोल तपास करीत पोलिसांनी गोविंदा साबळे, आतिश ऊर्फ गुड्ड्या चौधरी यांना पकडले. एनडीपीएस व गुन्हे युनिट एकने मुख्य सूत्रधार सनी व सुमित पगारेसह अर्जुन पिवाल यांना गजाआड केले. त्यांनी सोलापुरात एमडीचा कारखाना व गोदाम सुरू केल्याचे उघड झाले. त्यानंतर मनोज गांगुर्डे, भूषण ऊर्फ राजा मोरे, मनोहर काळे, वैजनाथ हावळे, प्रथमेश मानकर, अक्षय नाईकवाडे, अमोल वाघ, उमेश वाघ, भूषण मोरे यांना अटक केली. संशयितांवर मोक्कानुसार कारवाई केली. तसेच ‘एमडी’चे धागेदोरे महाराष्ट्रासह परराज्यातही असल्याचे उघड झाले. हैदराबाद व केरळमधून रसायन खरेदी करीत सोलापुरात पाठविणाऱ्या मोहम्मद अरजास एम. टी (रा. कोझिकोडा, केरळ) यालाही अटक झाली आहे.
हेही वाचा –