नाशिक : पुढारी वृत्तसेवा- देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी एेन रंगात असताना समांतर शासन व्यवस्थेचा दावा करणाऱ्या एसी सरकारने जिल्ह्यात डोकेवर काढले आहे. नाशिक व दिंडाेरी मतदारसंघातील आदिवासी बांधवांनी निवडणुकीत मतदान करू नये, असे आवाहन एसी सरकारच्या पाठीराख्यांनी केले आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी या घटनेची दखल घेत अशा व्यक्तिविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिस विभागाला दिले आहेत. (A/C Sarkar In Nashik)
लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. तब्बल २१ राज्यांत मतदानाचा पहिला टप्पा पारदेखील पडला आहे. जसजशी ही निवडणूक पुढे जाईल, तशी त्यामध्ये रंगत भरली जाणार आहे. एकीकडे निवडणुकांचे वारे वाहत असताना गडचिरोलीत काही दिवसांपूर्वी एसी सरकारला मानणाऱ्या अनुयायांनी मतदान करू नका, असे आवाहन तेथील जनतेला केले. याच एसी सरकारच्या काही पाठीराख्यांनी गेल्या आठवड्यात त्र्यंबकेश्वर येथे एसी सरकारचा स्तंभ उभारला होता. एवढेच नव्हे तर हा स्तंभ उभारताना आदिवासी बांधवांना मतदान न करण्याचे आवाहन केले होते. याची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी अगोदरच अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविला आहे. जिल्हाधिकारी शर्मा यांनीदेखील या साऱ्या प्रकारची दखल घेत संबंधित व्यक्तिविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. आदिवासी बांधवांमध्ये मतदानाबद्दल जनजागृती करावी, अशा सूचनाही दिल्याचे जलज शर्मा यांनी सांगितले.
एसी सरकार म्हणजे काय? A/C Sarkar In Nashik
एसी सरकारचे सदस्य हे भारत सरकार व ब्रिटनच्या राणीला आपलं मानत नाही. या समूहातील अनुयायांनी थेट ब्रह्मगिरीवर दावा केला. एसी सरकारने त्र्यंबकला उभारलेल्या स्तंभावर अशोकस्तंभासह न समजेल अशा भाषेत मजकूर लिहिला हाेता. या कथित सरकारचा एसी कुंवर केशरीसिंह नामक राजा असल्याचे व त्यांचे मुख्यालय गुजरात डांग प्रदेशात असल्याचे सांगितले जाते. भारत देश आमच्या मालकीचा आहे. फलक लावलेले ठिकाण आमच्या राज्याच्या अधिपत्याखाली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. भारत सरकार हे आमच्या राजाचे नोकर असून, या कथित सरकारला मानणाऱ्या लोकांचे काही वर्षांपूर्वी वणी-दिंडोरी भागात अधिवेशन झाल्याची चर्चा आहे.
हेही वाचा –