सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाचे काम थांबविण्याचे आदेश, नेमकं कारण काय?

सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड,www.puddhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- बहुचर्चित सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाचे काम पुढील आदेशापर्यंत थांबविण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (‘न्हाई’) दिले आहेत. तसे पत्रच ‘न्हाई’ने प्रशासनाला पाठवले आहे. त्यामुळे नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेपाठोपाठ जिल्ह्यातील हा महत्त्वपूर्ण प्रकल्प बासनात गुंडाळला जाण्याची दाट शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेंतर्गत १ हजार २७१ किलोमीटर लांबीचा महामार्ग उभारण्यात येणार आहे. नाशिक, नगर व सोलापूर अशा तीन जिल्ह्यांतून जाणाऱ्या महामार्गासाठी जमीन संपादन करायची आहे. परंतु, प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या ‘न्हाई’ने जिल्हा प्रशासनांना पत्र लिहीत प्रकल्पाचे काम सद्यस्थितीत आहे त्याच टप्प्यावर थांबवावे, असे आदेश दिले आहेत. तसेच पुढील आदेशाची वाट पाहावी, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. परिणामी महामार्गाच्या उभारणीचे कामकाज थंडावले आहे.

सुरत-चेन्नई महामार्ग हा नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, दिंडोरी, निफाड, नाशिक व सिन्नर या सहा तालुक्यांतून जाणार आहे. या महामार्गाची जिल्ह्यातील लांबी साधारणत: १२२ किलोमीटरच्या आसपास असून, त्याकरिता ९९६ हेक्टर जमीन संपादित करायची आहे. सहा तालुक्यांत बहुतांश खासगी क्षेत्राची मोजणी पूर्ण झाली असून, अधिग्रहणासाठीचा आवश्यक निधीदेखील त्या-त्या तालुक्यांकडे उपलब्ध झाला आहे. त्यामुळे लवकरच महामार्गाच्या कामास प्रारंभ होईल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, प्रकल्प उभारणीची जबाबदारी असलेल्या ‘न्हाई’कडून तूर्तास कामकाज थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे एकूणच प्रकल्पाच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

नवीन सरकार घेणार निर्णंय

निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे पुढचे तीन महिने शासकीय कामकाज थंडावणार आहे. या काळात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यावर बंधने असतील. अशावेळी सुरत-चेन्नई महामार्गाबाबतचा निर्णय थंड बस्त्यात पडणार आहे. केंद्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर प्रकल्प उभारणीचा निर्णय होईल. त्यामध्ये किमान ३ महिने जाणार असल्याने शेतकऱ्यांचा जीव आता टांगणीला लागला आहे.

किती मोबदला मिळणार?

जमिनींच्या दरावरून नाशिक, निफाड व दिंडाेरी तालुक्यांतील शेतकऱ्यांनी महामार्गालाच विरोध दर्शविला आहे. त्यामुळे अगोदर दोन महिने प्रकल्पाच्या कामाला विलंब झाला आहे. या सर्व घडामोडींत जिल्हा प्रशासनाकडून अधिग्रहणाचे दर घाेषित झाल्यानंतर शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात राबता वाढला आहे. दररोज पाच ते दहा शेतकरी येऊन आम्हाला किती मोबदला मिळेल, याची खातरजमा करून घेत आहेत. आता शेतकरी जमीन देण्यास तयार होत असून, अधिग्रहणासाठीचा निधीदेखील प्रशासनाच्या हाती आहे. परंतु ‘न्हाई’च्या लेटरबॉम्बमुळे पुढील प्रक्रिया रखडली आहे.

असा आहे प्रकल्प

-सुरत-चेन्नई द्रुतगती महामार्ग लांबी १२७१ किलोमीटर

-सुरत ते सोलापूर तसेच सोलापूर ते चेन्नई असे दोन टप्पे

-नाशिक-सुरत प्रवासाचा कालावधी पावणेदोन तासांवर येणार

-गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र व तमिळनाडू राज्यांतून महामार्ग जाणार

-ग्रीनफिल्ड नाशिक, नगर, सोलापूर, कलबुर्गी, कुरनूल, कडप्पा व तिरुपती या शहरांना जोडणार

हेही वाचा –

The post सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाचे काम थांबविण्याचे आदेश, नेमकं कारण काय? appeared first on पुढारी.