उत्तर महाराष्ट्रातील पहिलं ‘ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर’ नाशिकमध्ये

ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर नाशिक,www.pudhari.news

आनंद बोरा : पुढारी वृत्तसेवा

नाशिकमधील जखमी वन्यप्राण्यांच्या उपचारासाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर असावे, ही वन्यजीवप्रेमींची मागणी तब्बल २२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता अखेर संपुष्टात आली आहे. म्हसरूळ येथील वनविभागाच्या दोन एकर जागेपैकी एक एकरमधील उपचार केंद्राचे अद्ययावत बांधकाम पूर्ण झाले असून, वनविभागाने हे सेंटर रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेबरोबर नुकताच करार करून हस्तांतर केले असून, आता पुढच्या महिन्यात सुरू होणारे सेंटर वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली वन्यप्राण्यांवर उपचार करणार आहे.

नाशिक शहरातील वन्यप्राण्यांसाठी संक्रमण उपचार केंद्राचे महत्त्व लक्षात घेऊन माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यास ग्रीन सिग्नल दिला होता. भौगोलिकदृष्ट्या नाशिक शहर हे समृद्ध पक्षी आणि प्राणी यांचे केंद्र आहे, त्यामुळे नाशिकमध्ये वन्यजीव उपचार केंद्राची नितांत गरज होती. जिल्ह्यात वन्यप्राण्यांसाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर सुरू करण्यासाठी वनविभाग आणि प्राणिमित्र 1998 पासून सातत्याने प्रयत्न करत होते. अखेर ही प्रतीक्षा संपली असून, नाशिकमध्ये हे केंद्र सुरू करण्यात आले. उत्तर महाराष्ट्रातील जखमी वन्यप्राण्यांवरही उपचार होणार आहेत.

नऊ बिबटे जखमी

वन्यप्राण्यांना दुखापत झाल्यास त्यांना उपचारासाठी अनेकदा कात्रज किंवा बोरिवली येथे पाठवले जात होते. नैसर्गिक अधिवासात किंवा शिकारी प्राण्यांच्या वर्चस्वामुळे वन्यजिवांमध्ये नेहमी संघर्ष होतो त्यामध्ये अनेक वेळा वन्यप्राणी जखमी होत असतात तसेच अपघातांमुळे वन्यप्राण्यांना शारीरिक इजा होते. बिबट्या विहिरीत पडून जखमी झाल्याच्या अनेक घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. अशा जखमी वन्यप्राण्यांवर उपचार करण्यासाठी अशा केंद्राची गरज होती. वाहनांच्या धडकेने बिबट्या, कोल्हे, तरस, हरीण, उदमांजर या वन्यप्राण्यांचे अपघात झाले आहेत. मागील वर्षी 9 बिबटे, 11 कासवे आणि 2 कोल्हे जखमी होऊन त्यांना पुणे, मुंबई आणि गुजरात येथे उपचारासाठी पाठवण्यात आले होते.

विविध प्रकारचे पिंजरे

सेंटरमध्ये वन्य प्राण्यांना ठेवण्यासाठी विविध प्रकारचे पिंजरे असतील, ज्यात उपचार पिंजरे, उपचारादरम्यान वापरण्यासाठी पिंजरे आणि जनावरांना ठेवण्यासाठी नियमित पिंजरे असतील. तसेच ड्रेसिंग रूम, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, मल्टिपर्पज रूम, मेडिसिन रूमदेखील असणार आहे. मध्यभागी दोन वाघांच्या जागांसह आठ बिबट्यांसाठी जागा आहेत.

चोवीस तास सेवा

उत्तर महाराष्ट्रातील अशा प्रकारचे हे पहिलेच वन्यजीव उपचार केंद्र आहे. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबक, इगतपुरी, सिन्नर, पेठ अशी आठ वनक्षेत्रे आहेत. त्यांना या सेंटरचा फायदा होणार आहे. या सुविधेत बिबट्यांसाठी आठ, वाघांसाठी दोन, कोल्ह्यांसाठी पाच पिंजरे असतील आणि दोन इतर प्राण्यांसाठीही असणार असून, या प्राण्यांसाठी स्वतंत्र विभागदेखील असणार आहेत. स्वतंत्र आयसीयूने सुसज्ज असेल तसेच पोस्ट मार्टमदेखील असणार आहे. हे सेंटर चोवीस तास सुरू राहणार असून, ॲम्ब्युलन्सचीही व्यवस्था राहणार आहे. प्रत्येक पिंजऱ्यासाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजनदेखील करण्यात आले आहे. एका वेळेस २९ वन्यप्राणी ठेवता येतील, असे पिंजरे तयार केले असून, पिंजऱ्याच्या मागे वन्यप्राण्यांना फिरता यावे, यासाठी मोकळी जागादेखील सोडण्यात आली आहे. सरपटणारे प्राणी आणि सस्तन प्राणी विभागदेखील या सेंटरमध्ये समाविष्ट आहेत.

हेही वाचा-

The post उत्तर महाराष्ट्रातील पहिलं 'ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर' नाशिकमध्ये appeared first on पुढारी.