ऑन कॅमेरा रेकॉर्ड: स्थानिक पदाधिकाऱ्यांविरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांची नाराजी

MNS

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – लोकसभा निवडणूकीचे वातावरण शांत होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील खदखद चव्हाट्यावर आली आहे. कार्यकर्त्यांसाठी आयोजित मिसळ पार्टीत पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांविरोधात कार्यकर्त्यांनी उघड नाराजीचा सूर आवळला आहे. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांच्या भावना ऑन कॅमेरा रेकॉर्ड करण्यात आल्या असून त्या पक्षप्रमुख राज ठाकरे यांना पाठविले जाणार आहेत. त्यामुळे ठाकरे काय निर्णय घेतात याकडे अवघ्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

राज्यातील लोकसभा निवडणूकांचा टप्पा संपुष्टात आला आहे. यंदाच्या निवडणूकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांना बिनर्शत पाठिंबा दिला. ठाकरे यांनी महायुती उमेदवारांसाठी ठिकठिकाणी सभा घेताना पक्ष कार्यकर्त्यांना संबंधित उमेदवारांच्या पाठिशी उभे राहण्याचे आदेश दिले. खुद्द पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार नाशिकमध्ये कार्यकर्त्यांनी महायुतीसाठी काम केले. लोकसभा निवडणूकीतील कामाचा आढावा तसेच येत्या विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांसाठी मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले. या पार्टीपासून पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना दूर ठेवण्यात आले.

मिसळ पार्टीमधून कार्यकर्त्यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली. लोकसभा निवडणूकीमध्ये कार्यकर्त्यांनी पदरमोड करुन प्रचार केला. परंतु, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वाऱ्यावर सोडल्याची भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली. एवढेच नव्हे तर कॅमेरासमोर कार्यकर्त्यांनी पक्षातंर्गत बाबी विषद केल्या. मनसेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच कार्यकर्त्यांनी थेट पक्षामधील नाराजीचा सूर आळवला आहे. मिसळ पार्टीच्या माध्यमातून मनसेमधील वादाच्या तर्रीला उकळी फुटली आहे. त्यामुळे पक्षातील वादावर राज ठाकरे हे काय निर्णय घेतात यावर आगामी निवडणूकांचा सारे गणित अवलंबून असणार आहे.

साहेब, नाशिककडे लक्ष द्या

नाशिक शहरातून तीन आमदार व नाशिक महापालिकेचे सत्ता उपभोगणाऱ्या मनसेत मागील काही वर्षात मरगळ आली आहे. एकेकाळी मनसेचा गड असलेल्या नाशिकमध्ये पक्ष चाचपडत आहे. अशा परिस्थितीत मिसळ पार्टीमधून कार्यकर्त्यांनी थेट पक्षातील वादावरच बोट ठेवले आहे. तसेच राज ठाकरे यांनी नाशिककडे लक्ष द्यावे, असे आर्जव केले आहे. ठाकरे कार्यकर्त्यांच्या भावनांची काय दखल घेणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

मनसे कार्यकर्त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी मिसळ पार्टीचे आयोजन केले. पार्टीमध्ये पदाधिकाऱ्यांना दुर ठेवण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांच्या भावनांमधून काही पदाधिकाऱ्यांबद्दल मतभेद दिसून आले. पण मनभेद नव्हते. त्यानूसार संबंधित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन विषय मार्गी लावला आहे. कॅमेरातील रेकाॅर्डिंग हे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना देणार आहे. संघटना मजबूत करणे हा त्यामागील उद्देश आहे. – पराग शिंत्रे, उपाध्यक्ष, मनसे.

हेही वाचा: