नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कत्तलीसाठी गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या संशयितास भद्रकाली पोलिसांनी पकडले आहे. पोलिसांनी वाहनातून सहा जनावरांची सुटका केली असून वाहनचालकाविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भद्रकाली पोलिस ठाण्यातील गंजमाळ बीट मार्शलचे पोलिस अंमलदार अनिल महाजन यांना मिळालेल्या माहितीनुसार, भद्रकाली पोलिसांच्या पथकाने काठेगल्ली सिग्नल ते द्वारका परिसरात वाहन तपासणी केली. महाजन यांना एम. डी. टी. प्रणालीवर एमएच ०५ आर ६९५७ क्रमांकाच्या वाहनातून गायींची तस्करी होत असल्याचे समजले. त्यानुसार त्यांनी काठेगल्ली परिसरात संबंधित वाहनाची तपासणी केली असता त्यात जनावरे आढळून आली. मात्र वाहन चालक पोलिसांना पाहून फरार झाला. वाहनातील जनावरे हे कत्तलीसाठी नेले जात असल्याचे पोलिस तपासात समोर आले. त्यामुळे पाेलिसांनी जनावरांसह वाहन ताब्यात घेतले. तसेच वाहन चालकाविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा, केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
२० जनावरांची सुटका
गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानेही रविवारी (दि.१९) रात्री तिगरानीया रोडवरील एका पत्र्याच्या शेडमध्ये कारवाई करीत २० जनावरांची सुटका केली होती. तर १४०० किलो मांस व वाहन असा ५ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल आहे.
हेही वाचा –