आज धनत्रयोदशी : ‘असे’ करा धन्वंतरी पूजन; पाहा, मुहूर्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला, स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया..

परमपुज्य जी वंद्य या भारताला, नमस्कार त्या दिव्य गोदेवतेला..

अंधाराकडून तेजोमय जीवनाकडे घेऊन जाणाऱ्या प्रकाशपर्व दीपावली सणाला गुरुवारी (दि.९) वसूबारसने प्रारंभ झाला. नाशिककरांनी मनोभावे गाेमाता-वासराचे पूजन करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. दीपावलीनिमित्ताने सर्वत्र चैतन्य पसरले आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि.१०) घरोघरी धनत्रयोदशी साजरी होणार आहे.

दिवाळीचा पहिला दिवस अर्थात वसूबारस सर्वत्र उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने घरोघरी दिव्यांची आरास प्रज्वलित करतानाच अंगणात रांगोळी रेखाटली. सायंकाळी सुवासिनींनी सहकुटुंब गाय-वासराचे पूजन केले. यावेळी गाय-वासराला पुरणपोळी, उडदाचे वडे, गवारची भाजी, बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य अर्पण केले गेले. तसेच कुटुंबामध्ये सुख-शांती, समृध्दी, आरोग्य लाभावे, अशी मनोकामना करण्यात आली.

दीपावलीमधील दुसरा दिवस धनत्रयोदशीचा साजरा होणार आहे. समुद्र मंथनामधून श्री विष्णू हे श्री धन्वंतरी अवतार धारण करून हातात अमृत कलश घेऊन प्रगट झाले. वैद्यकीय क्षेत्रात यादिवशी श्री धन्वंतरी पूजनाचे महत्त्व अधिक आहे. तसेच घरोघरी श्री गणेश, श्री विष्णू, श्री लक्ष्मी, श्री कुबेर यांचे मनोभावे पूजन केले जाते.

धन्वंतरी पूजन मुहूर्त

सकाळी ६.५० ते दुपारी ११.२०

दुपारी १२.५० ते दुपारी २.२०

गोशाळांमध्ये गर्दी

वसूबारसचे औचित्य साधत पंचवटी तसेच चुंचाळे येथील पांजरापोळच्या गोशाळा तसेच नंदिनीसह विविध गोशाळांमध्ये नाशिककरांनी गाय-वासराच्या पूजनासाठी गर्दी केली. यावेळी गायीला गोडाधोडाचा नैवेद्य तसेच चारा अर्पण केला.

The post आज धनत्रयोदशी : 'असे' करा धन्वंतरी पूजन; पाहा, मुहूर्त appeared first on पुढारी.