Code Of Conduct : निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहिता लागू, पण का?

आचारसंहिता pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
आचार संहिता सुरु होण्याचे कारण काय?
आदर्श आचारसंहिता हा राजकीय पक्ष (political party) आणि त्या पक्षातील उमेदवारांसाठी तयार करण्यात आलेले असे नियम आहेत. निवडणूक आचारसंहिता ही निवडणुका मुक्त वातावरणात पार पडाव्यात, त्यात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करुन कोणतेही जातीय दंगे अथवा कोणत्याही स्वरूपाचे गैरव्यवहार होऊ नयेत या उद्देशाने भारतीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) तयार करण्यात आली आहे. निवडणुका जाहीर होताच निवडणूक आयोगाकडून ही आदर्श आचारसंहिता लागू करण्यात येते.

आचाससंहिता लागू होण्याचे कारण तरी काय ?
कोणत्याही राज्यात निवडणुका जाहीर होताच सर्वच राजकीय पक्ष दंड थोपटून निवडणूकीच्या रणांगणात उतरतात. यामध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारही हाताशी असलेल्या कार्यकर्त्यांना घेऊन विजयासाठी कोणतीही कसर राहू नये यासाठी कंबर कसून जोमाने कामाला लागतात. मात्र यामध्ये निवडणूकीतले आपल्याकडील पारडे जड होण्यासाठी उमेदवाराने कोणतेही चुकीचे डावपेच वापरु नये. यासाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात येते. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच लगेच आचार संहिता लागू केली जाते. निवडणूकीचा निकाल लागे पर्यंत ही आचार संहिता लागू असते. आचार संहितेत दिलेले नियम आणि अटींचे काटेकोरपणे पालन करुनच राजकीय पक्षांनी निवडणूक लढायची असते. कोणत्याही सत्ताधारी पक्षाने सत्तेचा गैरवापर, सरकारी यंत्रणेचा गैरवापर करू नये याचे भान ठेवण्यात येते.

सर्वात पहिले आचारसंहिता कुठे सुरू झाली?
सर्वात पहिले १९६० मध्ये आदर्श आचारसंहिता केरळ विधानसभा निवडणुकीत लागू करण्यात आली होती. आदर्श आचारसंहिता ही कायद्याने आणलेली तरतूद नाही तर सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीने आणलेली व्यवस्था आहे. जी प्रत्येकाने पाळली पाहिजे. ज्या अंतर्गत उमेदवार काय करू शकतो आणि काय करू शकत नाही हे आचारसंहितेमध्ये सांगण्यात आलेले आहे.

आचारसंहितेची प्रथम अंमलबजावणी
निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना प्रथम १९६२ मध्ये ही आचारसंहिता सांगितली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत १९६७ च्या निवडणूक आयोगाने सर्व सरकारांना त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले. तेव्हापासून आजही या नियमांचे पालन कायम आहेत. परंतु निवडणूक आयोग मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काही प्रमाणात वेळेनुसार काही बदल करत असते.

आदर्श आचारसंहितेची आवश्यकता का झाली?
पहिले निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच उमेदवार हे त्यांची विकासकामे स्व:त जनतेपर्यंत नेण्यासाठी मोठे लाऊडस्पीकर लावून प्रचार करत होते. या काळात सार्वजनिक भिंती मोठ्ठाले पोस्टरने झाकाळून जायचे. तर काही राजकीय पक्ष आणि त्यांचा उमेदवार साम, दाम दंड वापरुन निवडणूक जिंकण्यासाठी अनेक नियमांकडे दुर्लक्ष करायचे. मतपेट्यांची लूटमार ही सामान्य गोष्ट होती. निवडणुकीच्या काळात लोकांना धमकावणे, पैसे वाटणे, मद्य, पार्ट्यांचे आयोजन करणे असे प्रकार सरार्सपणे वाढत होते. त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली.

आचारसंहितेचे नियम काय आहेत?
निवडणूक प्रक्रियेदरम्यान राजकीय पक्ष, उमेदवार आणि विविध राजकीय पक्ष मग त्यामध्ये सत्ताधारी, विरोधी पक्षांनी कसे वागावे हे आदर्श आचारसंहितेनुसार ठरवले जाते. त्यात त्यांचे निवडणूक प्रक्रियेदरम्यानचे सर्वसाधारण आचरण, सभा, मिरवणूका, मतदान दिवसाचे कामकाज आणि सत्ताधारी पक्षाचे कामकाज इत्यादींचा समावेश असतो.

आचारसंहितेच्या नियमांतर्गत राजकीय पक्षांवर केवळ त्यांची धोरणे, कार्यक्रम आणि भूतकाळातील नोंदीवरून टीका करता येते. कोणत्याही पुराव्याशिवाय कोणतेही आरोप करणे, जातीय आणि जातीय भावना दुखावणे, मतदारांना लाच देणे अशा विविध बाबी बेकायदेशीर ठरविण्यात आल्या आहेत.

पोलिसांकडून परवानगी घेणे
पोलिसांकडून निवडणुकीशी संबंधित सभा, निवडणूक रॅली किंवा मिरवणूक काढण्यापूर्वी प्रशासन आणि पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. त्याचबरोबर सभेचे ठिकाण आणि नियोजित वेळ नमूद करावी लागते. तसेच कोणतेही सरकारी वाहन, विमान इत्यादींसह कोणतीही सरकारी वस्तू नेत्याच्या फायद्यासाठी वापरण्याची परवानगी या काळात नसते. आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणुकीच्या दिवशी सुध्दा फक्त मतदार आणि निवडणूक आयोगाने जारी केलेले वैध प्रमाणपत्र असलेले नागरिक मतदान केंद्रात प्रवेश करू शकतात.

आचारसंहितेसाठी कायदा काय आहे
आदर्श आचारसंहितेसाठी कायदेशीर कायदा केलेला नाही. कायद्याने ते लागू नसल्यामुळे त्याअंतर्गत कोणालाही शिक्षा करण्याची तरतूद नाही. भारतीय दंड कायद्यानुसार १८६०, फौजदारी कायद्यानुसार १९७३ आणि लोकप्रतिनिधी कायद्यानुसार १९५१ मधील कायदे लागू केले जाऊ शकतात. ती कायदेशीर करण्याबाबत अनेकदा चर्चाही झालेली आहे. परंतु निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की, निवडणुका या फार कमी कालावधीसाठी होतात. त्यात न्यायालयीन कारवाईला भरपूर वेळ लागतो. त्यामुळे शिक्षेची तरतूद केलेली नाही. परंतु अनुचित प्रकार घडल्यास पोलीस किरकोळ स्वरुपात कारवाई करु शकतात.

The post Code Of Conduct : निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहिता लागू, पण का? appeared first on पुढारी.