नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा वेग वाढल्याने निफाडचा पारा शुक्रवारी (दि.९) पुन्हा एकदा ७.२ अंशांपर्यंत खाली घसरला. तसेच नाशिकमध्येही १० अंश तापमान नोंदविण्यात आले. हवामानातील या बदलामुळे सर्वसामान्य गारठले आहेत.
बंगालच्या उपसागरातील चक्रीय स्थितीमुळे गेल्या आठवड्यात राज्यात ढगाळ हवामानाने उकाड्यात वाढ झाली. परिणामी ऐन थंडीत जिल्हावासीय घामाघूम झाले. मात्र, दोन दिवसांपासून चक्रीयस्थिती निवळली असून, त्यातच उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढल्याने पाऱ्यात लक्षणीय घट झाली आहे. निफाडच्या किमान तापमानाच्या पाऱ्यात अवघ्या २४ तासांमध्ये सहा अंशांची घसरण होऊन तो ७.२ अंशांवर स्थिरावला. त्यामुळे निफाड तालुक्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला आहे. हवामानातील अचानक झालेल्या बदलाने द्राक्षबागांना फटका बसण्याची शक्यता असल्याने उत्पादक चिंतातुर झाले आहे. तर गहू व हरभऱ्यासाठी हे वातावरण पोषक ठरणार आहे.
नाशिक शहराचा पाराही १० अंशांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांसह शेकाेट्या पेटविल्या जात आहेत. जिल्ह्याच्या अन्य तालुक्यातही वाऱ्यांचा वेग वाढल्याने नागरिकांना हुडहुडी भरली आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये थंडीचा जोर अधिक वाढेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला जात आहे.
हेही वाचा :
- पुणे : सव्वादोन कोटींचे कोकेन जप्त; नायजेरीयन तरुणाला अटक
- राजुरी शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
- कोल्हापूर : अधिकारी-ठेकेदारांकडून महापालिकेवर दरोडा
The post Nashik : निफाडच्या पाऱ्यात घसरण, थंडीच्या कडाक्यात वाढ appeared first on पुढारी.