मालेगावमध्ये हिरे- भुसे यांच्यात संघर्ष

दादा भुसे, अद्वय हिरे,www.pudhari.news

नाशिक : मिलिंद सजगुरे

राज्याच्या राजकारणात दशकानुदशके प्रभावी राहिलेल्या मालेगावस्थित हिरे घराण्याच्या वर्चस्वाला छेद देण्याची किमया दादा भुसे यांनी अलीकडील काळात साधली असताना, आता भुसे यांचे वर्चस्व मोडीत काढण्याची रणनीती हिरेंनी आखली आहे. याच अनुषंगाने भुसे यांना जेरीस आणण्याच्या दृष्टीने अद्वय यांच्या रूपाने हिरे घराण्यातील चौथी पिढी मैदानात उतरली आहे. शह-काटशहाच्या राजकारणात भुसे यांनी हिरेंच्या अधिपत्याखालील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या कारभाराचे वाभाडे काढल्याने दोहोंमधील राजकीय लढाई आता ज्ञानमंदिरापर्यंत येऊन पोहोचली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या या फैरींमुळे मालेगावमध्ये दिवाळीपूर्व फटाक्यांच्या आतषबाजीचा प्रत्यय येत आहे.

राजकारण असो की, सहकार, मालेगाव आणि हिरे घराणे असे जणू समीकरणच झाले होते. या दोन्ही प्रबळ व्यवस्थांवर हिरेंचा एकछत्री अंमल असल्याने अवघी सत्तासूत्रे या घराण्याकडे नियंत्रित होती. २००४ मधील विधानसभा निवडणुकीने मात्र राजकीय भूकंप घडवला. जिल्हा राजकारणात प्रबळ मानल्या जाणाऱ्या प्रशांतदादा हिरे यांचा पराभव करीत भुसे जायंट किलर ठरले. या निकालावर राज्यभर खल झाला होता. त्यानंतरच्या सलग तीन निवडणुकांमध्ये भुसे हे अजिंक्य राहिले. या काळात त्यांनी एकतर हिरे किंवा त्यांचेे पाठबळ लाभलेल्या प्रत्येक उमेदवाराला पराभवाची धूळ चारली. याशिवाय, जी सत्तास्थाने हिरे घराण्याच्या ताब्यात कित्येक वर्षांपासून होती, तीदेखील स्वत:च्या ताब्यात घेतली. स्वाभाविकच हिरे-भुसे राजकीय वैर शिगेला पोहोचले. मध्यंतरीच्या राजकीय उलथापालथीमध्ये भुसे यांनी मातोश्रीला अव्हेरून एकनाथी पंथ स्वीकारल्यानंतर मालेगावमधील राजकीय हालचालींनी नवे वळण घेतले. भुसे यांना शह देण्यासाठी अद्वय यांनी मनगटावर शिवबंधन बांधले आणि मातोश्रीप्रति निष्ठा अर्पण करीत भविष्यकालीन समराचे संकेत दिले.

भुसे यांना राजकीयदृष्ट्या जेरीस आणण्याच्या दृष्टीने हिरे यांनी त्यांच्या गिरणा सहकारी साखर कारखान्यामधील शेअर्स घोटाळ्याचे प्रकरण बाहेर काढले. त्यासाठी शिवसेना संपर्कनेते खा. संजय राऊत यांच्या माध्यमातून तोफ डागण्यात आली. त्याला भुसे यांनी प्रत्युत्तर देत राऊत यांच्याविरोधात मालेगाव न्यायालयात अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला. तदनंतरच्या घडामोडीत महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेतील कथित नियमबाह्य भरती प्रकरण बाहेर येऊन माजी मंत्री पुष्पाताई हिरे, प्रशांतदादा हिरे, डॉ. अपूर्व हिरे, अद्वय हिरे यांच्यासह अनेकांवर गु्न्हे दाखल झाले. ही कारवाई आकसबुद्धीने करण्यात आल्याचे सांगत त्यामागे मंत्री दादा भुसे हेच असल्याचा आरोप हिरे समर्थकांनी केला. या मुद्द्यावरून मालेगावमध्ये भुसे यांच्याविरोधात मोर्चाही काढण्यात आला. हिरेंच्या या कृतीला प्रत्युत्तर देण्यासाठी भुसे समर्थकांनी पत्र परिषद घेत उपरोल्लेखित गुन्हे दाखल होण्यासाठी विश्वस्तांची नियमबाह्य कृती कशी कारणीभूत आहे, याचा पाढा वाचला.

आगामी विधानसभा निवडणुकीत येनकेन प्रकारे भुसे यांना धूळ चारण्याच्या इराद्याने अद्वय हिरे यांनी कंबर कसली आहे. मालेगाव बाजार समिती निवडणुकीत भुसे समर्थक पॅनलला पराभूत केल्यानंतर हिरे यांचा उत्साह दुणावला आहे. स्वत:ला महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करत त्यांनी भुसे यांच्याविरुद्ध शड्डू ठोकला आहे. स्वाभाविकच वर्षभरावर येऊन ठेपलेल्या निवडणुकीत अद्वय हे भुसेंना पराभूत करून हिरे घराण्याला गतवैभव प्राप्त करून देतात की, एरव्हीप्रमाणे निवडणूक व्यवस्थापनात पारंगत असलेले भुसे विजयी पंच मारतात, याकडे उभ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहणार आहे.

हिरे घराणे प्रतिष्ठितांच्या यादीमध्ये…

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून जी घराणी राजकीय क्षितिजावर सातत्याने तळपत राहिलीत, त्यामध्ये मालेगावच्या हिरे घराण्याचे नाव घेतले जाते. दिवंगत भाऊसाहेब हिरे यांच्या नावाचा राज्यस्तरावर दबदबा होता. तत्कालीन परिस्थितीत राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा होताना मंत्रिपदावर असलेल्या भाऊसाहेब हिरे यांचेही नाव पुढे आले होते. त्यानंतरच्या वाटचालीमध्ये व्यंकटराव हिरे, बळीराम हिरे, पुष्पाताई हिरे, प्रशांतदादा हिरे यांनी राज्य मंत्रिमंडळात वेळोवेळी सहभाग नोंदवून राज्यस्तरीय राजकारणावरील पकड कायम ठेवली. काही वर्षांपूवी डॉ. अपूर्व हिरे यांनी विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघातून विजयश्री प्राप्त करून आमदारकीचा टिळा लावण्यात यश मिळवले. अद्वय हिरे यांनीही नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळवून स्वत:ला चर्चेत ठेवले. तथापि, दादा भुसे यांच्या राजकीय एन्ट्रीनंतर हिरे घराण्याची अनेक सत्तास्थाने खालसा झाली.

हेही वाचा :

The post मालेगावमध्ये हिरे- भुसे यांच्यात संघर्ष appeared first on पुढारी.