नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकमध्ये पुन्हा एकदा स्वाइन फ्लूचा उद्रेक होण्यास सुरुवात झाली असून, मालेगावातील ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तींचा या आजारामुळे नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू ओढावला आहे. स्वाइन फ्लूमुळे बळी गेलेले तीनही रुग्ण अनुक्रमे निफाड, सिन्नर आणि मालेगाव या नाशिकच्या ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे महापालिकेबरोबरच ग्रामीण आरोग्य-वैद्यकीय यंत्रणाही कामाला लागली आहे. Swine Flu Nashik
तीन वर्षांपूर्वी नाशिक शहरात कोरोनाने थैमान घातले होते. या महामारीपूर्वी स्वाइन फ्लूची लागण नाशिकसाठी जीवघेणी ठरली होती. कोरोनापश्चात दोन वर्षे कोरोनाच्या साइड इफेक्टस्मुळे उद्भवलेल्या आरोग्यविषयक तक्रारींत सरली. आता लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण पेटू लागले असताना पुन्हा एकदा स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. बदलते वातावरण या आजाराची लागण होण्यास पोषक ठरले आहे. मार्च महिन्यात निफाड तालुक्यातील एकाचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू ओढावला होता. त्यानंतर सिन्नर तालुक्यातील दातली गावातील ६३ वर्षीय महिलेचा या आजाराने बळी घेतला होता. हे दोन्ही रुग्ण नाशिक शहरातील खासगी रुग्णालयांता उपचार घेत होते. या रुग्णांवर उपचार सुरू असताना मालेगावातील एक स्वाइन फ्लूग्रस्त वृद्ध रुग्ण नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू पावल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या १० एप्रिल रोजी या रुग्णांचा अहवाल स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून या रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी (दि. २२) उपचार सुरू असताना या रुग्णाची प्राणज्योत मालवली.
अशी आहेत स्वाइन फ्लूची लक्षणे…
स्वाइन फ्लू आणि कोरोनाच्या लक्षणांमध्ये साम्य आहे. थंडी, ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब या लक्षणांचा यात समावेश आहे. त्यामुळे स्वाइन फ्लू टाळण्यासाठी वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा. पौष्टिक आहार घ्या. लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री व हिरव्या पालेभाज्या यासारख्या पदार्थांचा आहारात वापर करा. धूम्रपान टाळावे. पुरेशी झोप व विश्रांती घ्या. रुग्णांनी मास्क वापरावा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार घेऊ नका, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी केले आहे.
हेही वाचा –
- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्रालयाच्या खात्यातून लाखो रुपये चोरीला
- मुंबईत शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात