नाशिक : पुढारी वृत्तसेवा- २००३ मधील सिंहस्थ कुंभमेळ्यात दुसऱ्या पर्वणीदरम्यान पारंपारिक शाहीमार्गावरील सरदार चौकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेतून धडा घेत आगामी सिंहस्थापूर्वी शाहीमार्गाचे रुंदीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सदर रस्त्याचे २०१७च्या मंजूर विकास आराखड्यात प्रस्तावित असलेल्या विकास योजनेनुसार विकसन करण्यासाठी बाधित ठरणाऱ्या मिळकती संपादीत कराव्या लागणार असून, या मिळकतींची माहिती सादर करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी दिले आहेत. दरम्यान, पारंपरिक शाहीमार्गाच्या रुंदीकरणावरून मोठा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी सिंहस्थ आराखड्यात प्रस्तावित कामांची गुरूवारी स्थळपाहणी केली. यावेळी पारंपरिक शाहीमार्गाची आयुक्तांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. मंजूर विकास आराखड्यातील विकास योजनेनुसार विकसन करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. सध्याचा जुना शाही मार्ग तपोवन ते काळाराम मंदिरापर्यंत नऊ मीटर रूंद, तेथून पुढे सरदार चौक ते रामकुंडापर्यंत सात ते साडेसात मीटर रुंद आहे. हा रस्ता ३० मीटर रुंदी करण्याची शिफारस असली तरी पालिका सदर रस्ता १२ मीटरपर्यंत रुंद करण्याच्या तयारीत आहे.
सांडव्यांचेही होणार स्ट्रक्चरल ऑडिट
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड व लक्ष्मणकुंड येथील सांडवा आणि इतर सांडवे यांचीस्ट्रक्चरल स्टॅबिलिटची तपासून मजबुतीकरणासाठी उपायोजना करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. नदीकाठावरील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, नुतनीकरण तसेच गोदावरी नदीवरीलदेवी मंदिरासमोरील मनपा मालकीची इमारत आगामी सिंहस्थाच्या दृष्टीने उपायोगात आणता येईल का याबाबत त्यांनी सुचना दिल्या.
गोदाघाटावरील पुलांचे होणार नुतनीकरण
आगामी सिंहस्थ शाही मिरवणुका व रामरथ, गरुडरथ, गाडगे महाराज पुलाखालून येतांना पुलाच्या उंचीमुळे मिरवणुकीस मर्यादा येतात. त्यामुळे पुलाखाली खड्डा ठेवावा लागतो. त्यामुळे परिसराचे विद्रुपीकरण होते. त्यामुळे पुलाचे मजबुतीकरण व नुतनीकरण पुलावरून एक रॅम्प उतरवता येऊ शकेल काय याबाबत सुचना दिल्या. पार्कींगसाठी गणेशवाडी येथे अमरधाम समोरील जागा ताब्यात घेणे, टाळकुटेश्वर पुलाला समांतर पुल बांधण्यासाठी भूसंपादनाच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
तपोवनातील इमारतीवर मजले चढवणार
जुने गणेशवाडी पंपिंग स्टेशन येथे अग्निशमन केंद्र, तपोवन येथे लक्ष्मी नायारण मंदिरालगत नवीन पुल, कमानीचे नुतनीकरण, नदी घाटांचे नुतनीकरण व नवीन घाट बांधण्यासाठी आयुक्तांनी जागेची पाहणी केली. तपोवनातील सिंहस्थ साठीच्या प्रशासकीय इमारतीची पाहणी करून त्याची क्षमता वाढविणेच्या दृष्टीने त्यावर एक किंवा दोन मजले बांधणेसाठीची शक्यता पडताळून बघणेच्या सुचना दिल्या. श्री शनैश्वर मंदिरालगत गाईचा गोठा तसेच बटुकेश्वर मंदिरालगत झालेले अनाधिकृत बांधकाम व नाशिक मनपाच्या संपादित जागेत होत असलले अतिक्रमण हटविणेच्या सुचना दिल्या.
हेही वाचा-