कुंभमेळ्यासाठी केंद्राकडून भरीव मदत देऊ : गडकरी

गडकरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- फुले, शाहू, आंबेडकरांची समतामूल्ये चिरकाल टिकून राहण्यासाठी तसेच देशात शिवशाही, रामराज्य आणण्यासाठी भारत विश्वगुरू बनने गरजेचे आहे. त्यासाठी देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना पुन्हा विराजमान करण्याची आवश्यकता आहे, असे नमूद करत नाशिकमध्ये २०२७मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडून भरीव सहकार्य दिल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

नाशिक लोकसभा मतदारासंघातील महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ गोदाघाटावरील भाजीबाजार पटांगणावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर हेमंत गोडसे यांच्यासह केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आदी उपस्थित होते. मोदींच्या गेल्या दहा वर्षांतील सत्ताकाळात झालेल्या विकासकामांचा उल्लेख करत गडकरी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. सुरूवातीला पंडित नेहरू त्यानंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी ‘गरीबी हटाव’चा नारा देत आहेत. काँग्रेसच्या ६० वर्षांच्या सत्ताकाळात गरीबी हटू शकली नाही. परंतू मोदींनी गेल्या दहा वर्षांतच देशाचे चित्र बदलले. एनडीएला ४०० जागा मिळाल्यास संविधान बदलणार, अशी दिशाभूल करण्याचे काम काँग्रेसकडून सुरू आहे. पण देशाचे संविधान कुणीही बदलू शकत नाही. घटनेची मुलभूत तत्वे बदलता येत नाहीत. ८० वेळा घटना बदलण्याचे पाप काँग्रेसनेच केले, असेही गडकरी यांनी सांगितले.

नाशिक शहराच्या आसपास दहा हजार कोटींची कामे करण्याची संधी मला मिळाली, असे नमूद करत समृध्दी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाची निविदा निघाली असून आचारसंहितेनंतर या कामाला सुरूवात होईल. गोंदे-पिंप्री सदो महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाला लवकरच सुरूवात होईल. सुरत-चेन्नई महामार्ग नाशिक, अहमदनगर, सोलापूरचे भवितव्य बदलविणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करत ८० हजार कोटींच्या या महामार्गाच्या कामात नाशिकच्या टप्प्यात पाच हजार कोटींची कामे होतील. निफाड येथील ड्रायपोर्टचे काम निवडणुकीनंतर सुरू केले जाईल, असे नमूद करत कांदा प्रश्नावरही गडकरी यांनी भाष्य केले. शेतीमालाच्या निर्यातीवरही खुली झुट देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुका आटोपल्यानंतर शेतकरी हिताचे निर्णय होतील, या देशातील शेतकरी, समृध्द, संपन्न झाला पाहीजे, स्मार्ट शहरांबरोबर स्मार्ट व्हिलेजे‌स निर्माण व्हायला हवीत, अशी अपेक्षाही गडकरी यांनी व्यक्त केली. यावेळी आ. देवयानी फरांदे, आ. माणिकराव कोकाटे, आ. सीमा हिरे, आ. अॅड. राहुल ढिकले, शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते, भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव, बाळासाहेब सानप, मनसेचे अशोक मुर्तडक, सलीम शेख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

कांदाप्रश्नी कायमस्वरूपी तोडग्याचे मोदींचे आश्वासन!

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त करत कांदाप्रश्नावर लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला दिले असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी भाषणातून दिली. उमेदवारी न मिळाल्याने नाराज नसल्याचे स्पष्ट करत मोंदीचे हात बळकट करण्यासाठी हेमंत गोडसेंना मत देण्याचे आवाहन भुजबळ यांनी केले. नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी केंद्राकडून भरीव निधी मिळावा. नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण तसेच काँक्रीटीकरणाचे काम लवकर सुरू व्हावे, अशी अपेक्षा भुजबळ यांनी व्यक्त केली.

पावसाने सभेत व्यत्यय

गडकरी सभास्थळी येण्यापूर्वी जोरदार पाऊस सुरू झाला. यामुळे सभास्थळी जमलेली गर्दी पांगू लागली होती. अनेकांनी खूर्च्या डोक्यावर घेत पावसापासून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. काहींनी लगतच्या मंदिरांमध्ये, दुकानांच्या छताखाली धाव घेत स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. गडकरी यांचे सभास्थळी आगमन झाल्यानंतर मात्र पाऊस थांबला. सभा विनाव्यत्यय पार पडल्याने महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

हेही वाचा-