नाशिक : पुढारी वृत्तसेवा- विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागेसाठी शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपचे युवानेते विवेक कोल्हे यांच्यानंतर सोमवारी (दि.३) डॉ. राजेंद्र विखे-पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला आहे. डॉ. राजेंद्र विखे-पाटील यांच्या उमेदवारी अर्जाच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये अहमदनगर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.
विधान परिषदेच्या सात आमदारांचा कार्यकाळ जुलै महिन्यात संपुष्टात येणार आहे. नाशिक विभागातील विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्यासह पाच ते सहा उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची चर्चा आधीपासूनच सुरू आहे. त्यातही कोपरगावच्या माजी आमदारांचे चिरंजीव आणि भाजपचे युवानेते विवेक कोल्हे यांनी पहिल्याच दिवशी अर्ज सादर केला होता. त्यानंतर सोमवारी (दि.३) प्रवरानगर अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे-पाटील यांनी अर्ज सादर केला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत समर्थक प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
डॉ. राजेंद्र विखे-पाटील यांना राजकीय वारसा लाभला असून, त्यांचे बंधू राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपचे आमदार असून, सध्या राज्यात महसूलमंत्री आहेत. त्यासोबतच प्रवरानगर अभिमत विद्यापीठाचे कुलपती असल्याने शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यास तत्पर असल्याने शिक्षकांमध्ये देखील त्यांना मानणारा वर्ग आहे.
६ नामनिर्देशनपत्र सादर
दरम्यान, दिवसभरात ३ उमेदवारांनी ६ नामनिर्देशनपत्र सादर केली आहे. यामध्ये डॉ राजेंद्र विखे पाटील यांच्या वतीने दोन, निशांत रंधे यांच्या वतीने तीन तर राजेंद्र निकम यांच्या वतीने एक अर्ज सादर करण्यात आला आहे.
हेही वाचा