नाशिकमध्ये ॲपल कंपनीच्या नावे बनावट साहित्य विक्री करणाऱ्यांवर कारवाई

पोलिस कारवाईत जप्त करण्यात आलेले साहित्य,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ॲपल कंपनीच्या नावे बनावट मोबाइल साहित्य विक्री करणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कारवाई केली आहे. महात्मा गांधी रोडवरील मोबाइल साहित्य विक्री दुकानांमध्ये ही कारवाई केली. यात पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पाच विक्रेत्यांना ताब्यात घेतले आहे.

शहरातील एम.जी. रोड येथील मोबाईल ॲक्सेसरीज खरेदीसाठी शहरासह जिल्हाभरातून नागरिक येतात. याठिकाणी नामांकित कंपन्यांचे साहित्य उपलब्ध असल्याने ग्राहकांची गर्दी असते. मात्र यातील बहुतांश साहित्य बनावट असल्याचे वारंवार उघडकीस आले आहे. याआधीही या बाजारपेठेतील दुकानांमध्ये कारवाई करून पोलिसांनी लाखो रुपयांचे बनावट साहित्य जप्त केले आहेत. मंगळवारी (दि.१८) ॲपल कंपनीचे बनावट साहित्य विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

ॲपल कंपनीच्या मार्केटींग विभागाने केलेल्या तक्रारीनंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दुपारी छापा टाकला. गुन्हे शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या पथकाने एम.जी. रोडवरील प्रधान पार्कमध्ये असलेल्या पाच दुकानांवर छापे टाकले. यात बनावट ॲडप्टर, हेडफोन, बॅकप्लग असा सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी शिवम्‌ सेल्स, पटेल ॲक्सेसरीज, प्रवीण एजन्सीज्‌, शिवशक्ती टेलीकॉम्स, अंबिका ॲक्सेसरीज या दुकानांमध्ये पोलिसांनी कंपनी प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये छापा टाकला. पोलिस निरीक्षक ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, अंमलदार मुक्तार शेख, प्रविण वाघमारे आदींनी ही कारवाई केली. कारवाईची भनक लागताच इतर दुकानदारांनी त्यांचे दुकाने बंद ठेवली होती.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये ॲपल कंपनीच्या नावे बनावट साहित्य विक्री करणाऱ्यांवर कारवाई appeared first on पुढारी.