नाशिक : तब्बल ३९ तासांनंतर सिटी लिंक पूर्ववत, संप मागे

सिटी लिंक बससेवा नााशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या दोन महिन्यांपासून वेतन रखडल्याने सिटी लिंकच्या तब्बल पाचशे वाहकांनी बेमुदत संपाची हाक देत सिटी लिंक बससेवा ठप्प पाडली होती. संपाच्या पहिल्या दिवशी तोडगा न निघाल्याने, एकही बस डेपोमधून बाहेर पडली नाही. संपाच्या दुसऱ्या दिवशी मॅरेथॉन बैठकांनंतर वाहकांनी संप मागे घेण्याची घोषणा केली. तब्बल ३९ तासानंतर सिटी लिंक बस रस्त्यावर धावली.

दोन महिन्यांपासून रखडलेेले वेतन, वाहकांवरील अवाजवी दंड, दिवाळीचा बोनस, पगारवाढ, पीएफ व ईएसआयसी आदी मागण्यांसाठी मॅक्स डिटेक्टीव्ह अॅण्ड सिक्युरीटी सर्व्हिसेस कंपनी नियुक्त पाचशे वाहकांनी बंदची हाक दिली होती. त्यामुळे मंगळवारी (दि.१८) पहाटे ४.३० वाजेपासून एकही बस डेपोमधून बाहेर पडली नाही. सिटी लिंक कंपनीचे अधिकारी, ठेकेदार तसेच कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका होऊन देखील तोडगा न निघाल्याने, त्याची झळ संपाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी (दि.१९) देखील बसली. विशेषत: चाकरमाने, विद्यार्थी, कामगार यांचे मोठे हाल झाले. बुधवारी प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानायत यांनी संबंधितांची बैठक घेवून मागण्यावर चर्चा केली. त्यामध्ये येत्या शुक्रवारपर्यंत (दि.२१) सर्व वाहकांचे वेतन देण्याचे संबंधित ठेकेदारांना आदेश देण्यात आले. तसेच दंडात्मक कार्यवाहीबाबत फेरविचार करणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर संप मागे घेण्यात आला.

मनपा आयुक्तांच्या दालनात आयुक्त भाग्यश्री बानायत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीस सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, मुख्य महाव्यवस्थापक बाजीराव माळी, महाव्यवस्थापक मिलिंद बंड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रतिती खारतुडे, मॅक्स डिटेक्टीव्ह अॅण्ड सिक्युरीटी सर्व्हिसेस कंपनीचे व वाहकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दुपारपर्यंत चाललेल्या या बैठकीत तोडगा निघाल्यानंतर वाहकांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बसेस डेपोमधून बाहेर काढण्यात आल्या.

दोन दिवसात ५० लाखांचा फटका

सिटी लिंक कंपनीच्या दररोज २५० पैकी २०० बसेस शहर व परिसरात धावत असून, दररोज बसेसच्या सुमारे २५४० इतक्या फेऱ्या होत्या. यातून कंपनीला दिवसाला जवळपास २५ लाख रुपये महसूल प्राप्त होतो. मात्र, दोन दिवस बससेवा ठप्प असल्याने सिटी लिंक कंपनीला सुमारे ५० लाखांचा फटका बसला आहे. हा तोटा कोणाकडून वसूल केला जाईल, हे अद्याप स्पष्ट केले गेले नाही.

बे-भरवशाची सेवा

सिटी लिंक आणि संप नित्याचाच झाला असून, आता नाशिककरांकडूनच ही बससेवा बे-भरवशाची असल्याचे बोलले जात आहे. केव्हांही कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक दिली जात असल्याने, त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सोसावा लागतो. अशात ही सेवा किती भरवशाची असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

रिक्षावाल्यांची चंगळ

सिटी लिंक बससेवा ठप्प झाल्याने प्रवाशांनी खासगी वाहतुकीचा आधार घेतला. यामुळे आॅटो रिक्षावाल्यांची चांगलीच चंगळ झाल्याचे दिसून आले. यावेळी रिक्षावाल्यांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची लूट केल्याचे काही प्रकारही समोर आले.

हेही वाचा : 

The post नाशिक : तब्बल ३९ तासांनंतर सिटी लिंक पूर्ववत, संप मागे appeared first on पुढारी.