नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दरमहा दहा टक्के व्याजदराने कर्ज देण्याच्या बहाण्याने कर्जदारांकडून कित्येक पटीने वसुली करणाऱ्या खासगी सावकार वैभव देवरे यास नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन दिला आहे. इंदिरानगर पोलिसांत देवरे विरोधात खंडणी, अवैध सावकारीसह विनयभंगाचा असे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत.
व्यावसायिक विजय खानकरी यांच्याकडे बारा लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी संशयित वैभव देवरे (रा. चेतनानगर) याच्याविरुद्ध एप्रिल महिन्यात इंदिरानगर पोलिसांत पहिला गुन्हा दाखल झाला. त्यावेळी देवरेच्या घरझडतीत पंधरा बँक खात्यांची पुस्तके, एका व्यक्तीसह हॉटेलचे ५५ लाख रुपयांचे ‘बेअरर चेक’, चार कार, एक ट्रॅक्टर व चार दुचाकी समोर आली. सटाण्यात फार्म हाउस, पत्नीच्या नावे तीन फ्लॅट, एका कर्जदार महिलेच्या बळकावलेल्या दोन कार अशी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली. सर्वसामान्य नागरिक, महिला, व्यावसायिकांसह राजकीय नेत्यांना धमकावून त्याने सावकारीच्या बहाण्याने खंडणी वसूल केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. कर्जवसुलीतून आलेले पैसे नातलग, मित्र परिवारांच्या बँक खात्यात घेतल्याचे तसेच स्थावर मालमत्ता नातलगांच्या नावे केल्याचेही तपासात समोर आले. याप्रकरणी नातलगांसह इतरांविरोधात गुन्हा दाखल असून, त्यापैकी काहींना अटकपूर्व जामीन मंजूर झाला. दरम्यान, संशयिताने नाशिक शहरासह ग्रामीण भागातही नागरिकांना फसविल्याचे समजते.
हेही वाचा – ़