गिरीश महाजन पुन्हा ठरले ‘संकटमोचक’! जखमी होऊनही…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या नियोजनासाठी गेले चार दिवस नाशकात तळ ठोकून असलेले ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केवळ सभा यशस्वी करून दाखविली नाही, तर ते खऱ्या अर्थाने ‘संकटमोचक’ असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. सभेच्या दिवशी गर्दीचे नियोजन करताना कार्यक्रमस्थळी महाजन यांना छोटा अपघात झाला. बॅरिकेडिंगमधून जाताना कोसळून त्यांच्या चेहऱ्यावर जखम झाली. मात्र त्यानंतरही अखेरच्या क्षणांपर्यंत त्यांची धावपळ सुरूच होती. सभा संपल्यानंतर त्यांनी औषधोपचार घेतले. (Girish Mahajan)

२७व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिकच्या पुण्यभूमीतील सभेला आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे महत्त्व होते. मोदी या सभेच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार असल्याचे बोलले जात होते. त्यामुळेच हा कार्यक्रम शासकीय असला, तरी तो यशस्वी होण्यासाठी महायुतीने प्रतिष्ठा पणाला लावली होती. किंबहुना गिरीश महाजन यांच्या हाती सभेच्या नियोजनाची सूत्रे सोपविण्यात आल्याने ते गेल्या चार दिवसांपासून नाशकातच तळ ठोकून होते. अखेरच्या दिवशी तर सभास्थळी ते पहाटे 3 पर्यंत उपस्थित होते. सभेची सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी केवळ दोन तास झोप घेतली. त्यानंतर ते पुन्हा मैदानावर परतले. सभास्थळी पोलिस बंदोबस्त प्रचंड असल्यामुळे गर्दी पुढे सरकत नव्हती. किंबहुना सभेची वेळ जवळ आली, तरी अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. मंडपाबाहेर मात्र मोठ्या संख्येने लोक सभास्थानी येण्यासाठी जमले होते. पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कठोर तपासणीमुळे ही गर्दी रखडली होती. काळ्या रंगाचे कपडे, स्वेटर तसेच सोबत आणलेल्या पाण्याचा बॉटल्स या सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये बसत नसल्याने पोलिसांकडून अशा लोकांना सभास्थळी जाण्यापासून मज्जाव केला जात होता. ही बाब समजल्यानंतर महाजन यांनी तत्काळ प्रवेशद्वाराजवळ धाव घेतली. लोकांना सभास्थळी आणले. यावेळी काही युवक-युवतींना प्रवेश देण्यासाठी बॅरिकेडखालून जाताना महाजन यांचा तोल गेला. ते खाली कोसळले. त्यामध्ये त्यांच्या चेहऱ्याला मोठी जखम झाली. कमरेलाही मार लागला. त्यानंतरही ते थांबले नाहीत. सभेच्या नियोजनासाठी त्यांच्या समवेत भाजप आमदार ॲड. राहुल ढिकले, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते, नीलेश बोरा, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, लक्ष्मण सावजी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा :

The post गिरीश महाजन पुन्हा ठरले 'संकटमोचक'! जखमी होऊनही... appeared first on पुढारी.