गेम ओव्हर’च्या मेसेजमुळे हत्याकांड उघड ; 48 तासांत सुपारीबाज अटकेत

हत्‍या www.pudhari.news

नंदुरबार – परिवहन महामंडळात वाहकाची नोकरी करणारा व्यक्ती अचानक बेपत्ता होतो, दोन दिवसांनी एका पुलाखाली त्याचा जळालेला मृतदेह सापडतो हे सर्व शहादा पोलिसांना चक्रावून टाकणारे होते. परंतु जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चक्र फिरले आणि अवघ्या 48 तासात हत्या करणाऱ्यांना बेड्या ठोकल्या गेल्या. (Nandurbar Crime)

याविषयी आज दिनांक 20 मार्च 2024 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. या घटनेतील समोर आलेला धक्कादायक प्रकार असा की, मयत व्यक्तीच्या जावयाने सुपारी दिली होती आणि शहादा तालुक्यातील दोन युवकांसमवेत दोन अल्पवयीन मुलांनी या हत्याकांडाची सुपारी घेतली होती. हत्या केल्यानंतर त्यांनी पाठवलेला ‘गेम ओव्हर’चा मेसेज तपास पथकाच्या हाती लागला आणि त्यामुळे हा सर्व उलगडा होऊ शकला.

पत्रकार परिषदेत देण्यात आलेली माहिती अशी, शहादा पोलीस ठाणे हद्दितील रहिवासी मिनाक्षी राजेंद्र मराठे रा. सदाशिव नगर, शहादा यांनी दिनांक 14/03/2024 रोजी पती राजेंद्र उत्तमराव मराठे वय 53 वर्षे रा. सदाशिव नगर, शहादा हे बेपत्ता झाल्याची तक्रार शहादा पोलीस ठाण्यात दिली होती. त्या तक्रारीवरून शहादा पोलीसांनी मिसिंग केस दाखल केली होती. तपासाच्या दरम्यान जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाला डायल-112 वर शहादा येथील एका सतर्क नागरिकाने कॉल करुन तऱ्हावद रस्त्याच्या पुलाखाली प्रेत जळालेल्या अवस्थेत पडलेले असल्याची माहिती दिली. शहादा पोलीस प्रभारी शिवाजी बुधवंत आणि पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहचून पाहणी केली. मयताचा मुलगा याने ते प्रेत त्याचे वडील राजेंद्र उत्तमराव मराठे याचे असल्याचे सांगितले. त्यानुसार मयताची मुलगी भावना राजेंद्र सरोदे (मराठे) रा. सदाशिव नगर, शहादा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस. अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकूवा उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे (अति. कार्यभार), शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, शहादा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी शिवाजी बुधवंत तसेच स्थानिक गुन्हे शाखा, प्रभारी किरणकुमार खेडकर यांनी स्वतंत्र तपास पथके तयार करुन तपासाची चक्रे फिरवली.

तपासादरम्यान पोलीसांना गोपनीय माहिती व तांत्रिक पुराव्याच्या आधारे सदरचा गुन्हा हा निलेश ऊर्फ तुकाराम बच्चु पाटील रा. सालदार नगर, शहादा याने त्याच्या साथीदार अशांनी मिळून केल्याचे निष्पन्न झाले. पोलीस अधीक्षक  श्रवण दत्त.एस यांनी तात्काळ वेगवेगळी पोलीस पथके तयार करुन शोध घ्यायला रवाना केले. पुढे नंदुरबारच्या पथकाने मुंबई कांदिवली येथील पोलीस गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या मदतीने निलेश ऊर्फ निलु बच्चू पाटील वय 25 वर्षे, रा. सालदार नगर, शहादा, लकी किशोर बिरारे वय 18 वर्षे रा. भादा ता. शहादा व त्यांच्या सोबत दोन विधी संघर्ष बालके यांना पकडण्यात आले. त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. गोविंद सुरेश सोनार वय-34 रा. गुरुकुल नगर, नंदुरबार आणि जयेश मगन सुतार वय-30 रा. मुरली मनोहर कॉलनी, मलोनी, शहादा यांच्या सांगण्यावरून हा खून केल्याचे त्यांनी सांगितले.

गेम ओव्हर चा मेसेज आणि व्हिडिओही लागला हाती…

पुढील तपासात उघड झालेली पार्श्वभूमी अशी की, मयत मराठे यांचा जावई गोविंद सोनार याचा मयताची मुलगी (फिर्यादी) भावना हिचेशी प्रेमविवाह झाला होता. आरोपीचे पत्नीसोबत कौटूंबिक वाद होते, त्यामुळे आरोपी व फिर्यादी हे विभक्त राहत होते. दरम्यानच्या कालावधीत आरोपीच्या वडीलांचे निधन झाले. त्यातून आरोपी गोविंद सोनार याने आरोपी निलेश पाटील व त्यांचे सहका-यांसोबत कट रचून जीवे ठार मारले, तसेच त्याचे प्रेत पुलाखाली फेकून त्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून ते जाळले होते. खून करून झाल्यावर पुलाखाली जळतानाचा व्हिडिओ गोविंद सोनार याला पाठवण्यात आला होता. गोविंदाच्या मोबाईल मधून गेम ओव्हर चा मेसेज आणि तो व्हिडिओ हाती लागला त्यामुळे संशयीतांना अटक करून बेड्या ठोकण्यात आल्या.

यांनी केला तपास

या तपासाची कामगिरी पोलीस अधिक्षक श्रवण दत्त. एस. अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अक्कलकूवा उपविभागीय पोलीस अधीकारी सदाशिव वाघमारे (अति. कार्यभार), शहादा उपविभागीय पोलीस अधीकारी. दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे पोलीस अंमलदार अभय राजपुत, शोएब शेख, दिपक न्हावी, शहादा पोलीस ठाण्यात नेमणूकीस असलेले पोलीस नाईक योगेश थोरात, घनश्याम सुर्यवंशी, संदीप लांडगे, पोलीस अंमलदार मुकेश राठोड, योगेश माळी, दिनकर चव्हाण, भरत उगले, अनमोल राठोड यांनी पार पाडली.

The post गेम ओव्हर'च्या मेसेजमुळे हत्याकांड उघड ; 48 तासांत सुपारीबाज अटकेत appeared first on पुढारी.