नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतरही नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजीचे पाढे कायम आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ नाशिकमधील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारापासून दूरच असल्याचे दिसत आहे. ही बाब खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनाही नाशिक दौऱ्यादरम्यान खटकली असली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र भुजबळ यांची पाठराखण केली असून, त्यांची तब्येत नरमगरम आहे. तब्येत चांगली असल्यावर सर्व गोष्टी करता येतात, असे असल्याचे म्हटले आहे.
राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीची सत्ता असली तरी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात अनेक मतदारसंघांमध्ये निर्माण झालेला संघर्ष महायुतीतील वादाचे कारण ठरला आहे. नाशिकच्या जागेवरूनही महायुतीतील संघर्ष बराच गाजला. महाविकास आघाडीकडून उमेदवाराची घोषणा होऊन दीड महिना उलटला तरी महायुतीच्या जागेचा फैसला होत नव्हता. शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांची उमेदवारी परस्पर जाहीर करण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या वादात भाजपने उडी घेत नाशिकवर दावा केला, तर राष्ट्रवादीच्या भुजबळ यांनी आपली उमेदवारी थेट दिल्लीतून ठरविण्यात आल्याचे सांगत नाशिकवर हक्क सांगितला. मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र नाशिकची जागा प्रतिष्ठेची केल्याने अखेर उमेदवारीची माळ गोडसेंच्याच गळ्यात पडली. त्यामुळे भुजबळ नाराज आहेत. भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी भुजबळांची भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. खुद्द उमेदवार गोडसे यांनीदेखील बुधवारी भुजबळ यांची भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. याच दिवशी मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर असताना भुजबळ मात्र येवल्यातील बैठकीसाठी निघून गेले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीला त्यांनी सपशेल दांडी मारली. भुजबळांची ही कृती मुख्यमंत्र्यांना खटकली नसणार तर नवलच. यासंदर्भात पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता महायुतीत मनोमिलन झाल्याचे उत्तर देत त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले. त्यानंतरही भुजबळ गोडसे यांच्या प्रचारात सामील झालेले कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे प्रचाराच्या रणधुमाळीतही नाराजीचेच पाढे सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
भुजबळांच्या मनात नेमकं काय?
नाशिकमधून लढण्यासाठी छगन भुजबळ इच्छुक होते. मोदी, शाहांनी भुजबळांच्या नावाचा आग्रह धरला होता, असा दावाही त्यांनी केला होता. पण, वेळेत उमेदवारी जाहीर न झाल्याने भुजबळांनी रिंगणातून माघार घेतली. त्यानंतर नाशिकची जागा शिंदे गटाला गेली आणि गोडसेंना तिकीट दिले गेले. त्यामुळे भुजबळांनी प्रचारातून अंग काढून घेतले आहे. याबाबत भुजबळ म्हटले की, प्रत्येक ठिकाणी जाणे शक्य होत नाही, कधी कधी तिथे पदाधिकारी असतात. यासंदर्भात अजित पवारांना विचारले असता त्यांनी भुजबळ यांची पाठराखण केली आहे. भुजबळांची तब्येत थोडी नरम-गरम आहे. तब्येत चांगली असल्यावर सगळ्या गोष्टी करता येतात, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा –