
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- भक्तास आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन संशयितांनी भक्ताच्या घरातून २१ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना जेल रोड येथील भैरवनाथनगर येथे घडली. याप्रकरणी भक्ताने उपनगर पोलिस ठाण्यात गोपाल महाराज व त्याच्या जोडीदाराविरोधात चोरीची फिर्याद दाखल केली आहे.
भैरवनाथनगर येथे राहणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित गोपाल महाराज याच्यासमवेत नोव्हेंबर २०२३ मध्ये जेजुरी, आळंदी येथे देवदर्शनाच्या वेळी ओळख झाली होती. ओळखीनंतर डिसेंबर २०२३ मध्ये गोपाल महाराज नाशिकला आल्यानंतर त्याने भक्ताच्या घरी जाऊन आशीर्वाद दिला होता. भक्ताच्या घरी लग्नकार्य असल्याने त्यासाठी २१ लाख रुपये गोळा केले होते.
दरम्यान, नातलगाचे निधन झाल्याने भक्ताचे सर्व कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. त्यावेळी गोपाल महाराज त्याच्या जोडीदारासह शनिवारी (दि. ९) नाशिकला आला होता. भक्तासोबत देवदर्शन करून तो घरी आला. त्यावेळी गोपाल महाराजाने भक्तास दूध आणि नारळ आणण्यासाठी घराबाहेर पाठवले होते. भक्त घरी आल्यानंतर गोपाल महाराज आणि त्याचा जोडीदार दिसला नाही. त्यामुळे त्यांनी घरातील पैसे तपासले असता, तेदेखील सापडले नाही. भक्ताने गोपाल महाराजला फोन लावला मात्र संशयिताने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे भक्ताने नाशिक रोड पोलिस ठाणे गाठून चोरीची फिर्याद दाखल केली आहे.
हेही वाचा :
- शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक, मंत्रीमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब
- शिवाजी पार्कात फुटणार मविआच्या प्रचाराचा नारळ!, राहुल गांधी यांच्या सभेची तयारी
- ‘SBI’ने २६ दिवस काय केले?’: Electoral Bonds प्रकरणी सुप्रीम कोर्टाने अधोरेखित केलेले ठळक मुद्दे
The post गोपाल महाराजाचा भक्ताला आशीर्वाद, 21 लाख घेऊन झाला पसार ; काय घडलं? appeared first on पुढारी.