त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा- घरबसल्या पैसे कमावण्याच्या नादात त्र्यंबकेश्वर येथील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला दोन लाख १३ हजारांचा गंडा बसला आहे. रमाकांत सच्चिदानंद पांडे (२७, रा. निरंजनी आखाड्याजवळ, त्र्यंबकेश्वर. मूळ राहणार भगवानपूर, बिहार) हा संदीप विद्यापीठात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून, त्याची फसवणूक झाली आहे.
२६ जानेवारी रोजी त्याला एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आला. रितुश्री वुरवा नावाच्या व्यक्तीने रूकुटर स्कुप उप डिजिटल मार्केटिंग कंपनी, न्यू दिल्ली यासाठी वर्क फ्राॅम होम म्हणून काम करून दिवसाला तीन ते पाच हजार रुपये घरबसल्या कमावण्याची संधी असल्याचे आमिष दाखवले. व्हाॅट्सअॅपवर एक लिंक पाठवली. तसेच त्याला एका रेस्टॉरंटची माहिती पाठवण्यात आली. त्याबाबत गुगल मॅपवर चांगला रिव्ह्यू लिहिला तर २१० रुपये मिळतील, तसेच रिव्ह्यू चांगला असेल तर अशा प्रकारे दिवसाला २० ते २५ भारतीय रेस्टॉरंटची माहिती पाठवली जाईल. त्याबाबत रोख पैसे दिले जातील, असे सांगण्यात आले. त्याप्रमाणे रमाकांतने कृती केली असता २१० रुपये देण्यासाठी त्याच्या पेटीएमचा युपीआय मागवला गेला. त्यानंतर त्याच्या स्टेट बँक खात्यावरून दि.२६ ते २८ जानेवारीदरम्यान एकूण ११ वेळा ट्रान्झॅक्शन होऊन दोन लाख १३ हजार रुपये लंपास झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने त्र्यंबक पोलिस ठाणे गाठत संशयितांविरोधात फिर्याद नाेंदवली. पोलिस निरीक्षक बिपीन शेवाळे पुढील तपास करत आहेत.
ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. मोबाइलवर अनोळखी व्यक्तीला स्वत:ची खासगी माहिती पाठवणे, तसेच आलेली लिंक अथवा अॅप ओपन करणे धोकादायक असते. याबाबत काळजी घेण्याची आवश्यकता आहे. – बिपीन शेवाळे, पोलिस निरीक्षक, त्र्यंबक पोलिस ठाणे
हेही वाचा :
- Jalgaon News : अमळनेर तालुका क्रीडा संकुल उर्वरित बांधकामांचे भूमिपूजन
- व्यक्तीद्वेषाला विकासकामांतून उत्तर : आ. शंकरराव गडाख
- Gangubai kathiawadi : घमंडी कशी काय?; सीमा पाहवाने आलिया भट्टविषयी केला खुलासा
The post घरबसल्या इन्कमच्या नादात गमावले दोन लाख appeared first on पुढारी.