येवला : पुढारी वृत्तसेवा- ऑनलाइन फसवणुकीचे अनेक प्रकार घडत असतात, या प्रकारांना सर्वसामान्य अशिक्षित आणि माहिती तंत्रज्ञानाला नवपरिचित असे नागरिक बळी पडत असतात. आणि यातील बहुतांश गुन्हे हे कधीही उलगडले जात नाही, यातील आरोपी सापडले जात नाही. आता तर चक्क येवला शहरात छगन भुजबळांच्या निकटवर्तीयांना एका महाठकाने पन्नास हजाराला ऑनलाइन टोपी घातली असल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या प्रकरणातील संशयित महाठकाला येवला शहर पोलिसांनी अतिशय तांत्रिक पद्धतीने तपास करून जव्हार मोखाडा भागातून सिनेस्टाईल ताब्यात घेतले आहे.
याबाबत शहर पोलिसांमध्ये मागील आठवड्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आणि येवला शहरात भुजबळांचे विकास काम पाहणारे दीपक लोणारी यांनी शहर पोलिसांमध्ये फिर्याद दिली होती.
दिनांक 28 फेब्रुवारी रोजी तक्रारदारांच्या मोबाईल क्रमांकावर सकाळी आठ वाजता मेसेज आला की, साहेब आमचा अपघात झाला आहे. तीन जण ठार झालेले आहेत. साहेब प्लीज मदत करा. आम्ही येवल्याचे रहिवासी आहोत. पनवेल मध्ये गुणे हॉस्पिटल मध्ये आहोत. साहेब, प्लीज मदत करा आणि खाली रविकांत मधुकर फसाळे नाशिक असे नमूद केलेले होते. दरम्यान अतिशय कार्यतत्पर असलेल्या या भुजबळांच्या निकटवर्तीयांनी तात्काळ मदत म्हणून फोन पे ॲप द्वारे संबंधित संशयित ठकाला 50 हजार रुपये पाठवले. त्यानंतर संबंधित क्रमांकावर फोन केले असता फोन न लागणे फोन डायव्हर्ट केलेला असणे याचा संशय आल्याने तक्रारदार दीपक लोणारी यांनी येवला शहरामध्ये दिनांक 28 फेब्रुवारी रोजी कोणाचा बाहेरगावी एक्सीडेंट झाला आहे का? त्या तीन जण मयत झाले आहे का याची चौकशी मित्रांच्या साह्याने सर्वत्र केली मात्र असा काहीही प्रकार शहर व आसपास घडलेला नसल्याचे समजताच दीपक लोणारी यांनी येवला शहर पोलिसांमध्ये 23 एप्रिल रोजी फिर्याद दाखल केली होती. शहर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करीत मोबाईल लोकेशन व तांत्रिक विश्लेषण करून जव्हार मोखाडा भागातील एका खेड्यातून ताब्यात घेतले असून न्यायालयीन कोठडी मिळाली आहे अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा –