चिंतन बैठकीचे आयोजन भोवले ! माजी आमदार अनिल गोटेंसह 20 जणांवर गुन्हा दाखल

अनिल गोटे

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीदरम्यान अपर जिल्हादंडाधिकारी यांचे जमावबंदीचे आदेश असताना देखील कोणतीही पूर्व परवानगी न घेता तालुक्यातील दाभाडी येथे चिंतन बैठक घेणारे धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांच्यासह 20 जणांवर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रिय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा पराभव करण्यासाठी तसेच आयात काँग्रेस उमेदवारीला होत असलेल्या अंतर्गत विरोधाचा मुद्दा ऐरणीवर घेत माजी आमदार गोटे यांच्या पुढाकारातून परिवर्तन मंचतर्फे धुळे लोकसभेसाठी सर्वसमावेशक तिसर्‍या पर्यायासाठी चाचपणी करण्यासंदर्भात दाभाडी येथील सिध्देश्‍वर लॉन्समध्ये 16 एप्रिल रोजी चिंतन बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला धुळ्याचे माजी आमदार गोटे यांच्यासह लखमापूर येथील डॉ. विलास बच्छाव, धुळे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष शाम सनेर, टेंभ्याचे भाऊसाहेब अहिरे यांच्यासह भाजप आणि काँग्रेसमधील नाराज गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या चिंतन बैठकीत सर्वच पक्षांसह भाजपमधील असंतुष्टांना एकत्रित करून सर्वमान्य असा तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी चर्चा सुरू असताना भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी तेथे प्रवेश करीत गोंधळ घातल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. यासंदर्भातील घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी त्वरीत घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली होती.

यांच्यावर झाला गुन्हा दाखल
अपर जिल्हादंडाधिकारी यांचे जमावबंदीचे आदेश असताना देखील कोणतीही पूर्व परवानगी न घेता विनापरवाना सभा घेऊन सार्वजनिक शांतता धोक्यात येईल अशी भाषणे, हावभाव तसेच चिन्हे फलक लावल्याने माजी आमदार अनिल गोटे, धुळे जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष शाम सनेर, भाऊसाहेब चिला अहिरे (रा. टेंभे, ता. सटाणा), डॉ. विलास बच्छाव (रा. लखमापूर), प्रदीप देवरे, सरपंच (रा. अस्ताने), दीपक पवार (रा. अस्ताने), सम्राट जगताप (रा. मालेगाव) तसेच सिद्धेश्वर लॉन्सचे मालक चिंधा अहिरे (रा. दाभाडी) यांच्यासह 20 जणांवर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी देविदास पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा –