चित्रपट, वाचनाने विचारांना दिशा

valavalkar www.pudhari.news

नाशिक :

लाचखोरांवर अंकुश ठेवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धुरा सांभाळताना वेळेचे नियोजन ही तारेवरची कसरत असते. मात्र, एवढ्या व्यस्त दिनक्रमातूनही वाचन आणि चित्रपट पाहण्याची आवड जपण्यासाठी पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर या मिळेल तसा वेळेचा सदुपयोग करतात. वाचनाने आणि विविध विषयांवरील चित्रपटातून विचारांना दिशा मिळते, निर्णय क्षमता अधिक बळकट होते असे मत वालावलकर यांनी व्यक्त केले. बदलत्या तंत्रज्ञानासह त्यांची आवड जपण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असल्याचे दिसते.

पोलिस दलात नोकरी म्हटली की, वेळेचे भान विसरून प्रत्येकास कर्तव्य बजवावे लागते. त्यातही अधिकारी म्हणून जबाबदारी असल्याने इतर अधिकारी व कर्मचार्‍यांची सांगड घालून त्यांचा विश्वास संपादन करीत नेतृत्वाने काम करावे लागते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची जबाबदारी सांभाळतानाही नागरिकांशी जास्तीत जास्त संवाद साधणे, त्यांच्या तक्रारींवर काम करून लाच मागणार्‍या, घेणार्‍यांवर कारवाई करताना कधी कधी अनेक दिवस लागतात. हे काम अविरतपणे करताना वेळेचे भान राहत नाही. मात्र, थकवा घालवण्यासाठी व आवड जोपासण्यासाठी वाचन किंवा चित्रपट पाहण्यासाठी वेळ मिळेल असा प्रयत्न करते. वेळ मिळतोच असे नाही, मात्र वेळ मिळाल्यास संधी सोडतही नाही असे वालावलकर यांनी सांगितले.

ज्या चित्रपटातून सामाजिक, कौटुंबिक, शैक्षणिक आदी महत्त्वाच्या विषयांवर संदेश दिला जात असेल तो चित्रपट पाहण्यासाठी सर्वाधिक कल असतो. ‘माचिस, मचान, एक रुका हुआ फैसला’ आदी चित्रपट आवडीचे आहेत. त्याचप्रमाणे वाचनासही प्राधान्य आहे. स्पर्धा परीक्षेसाठी ‘मराठी वाङ्मय’ विषय असल्याने वाचनाची गोडी आणखीन वाढली. जी. ए. कुलकर्णी, पु. ल. देशपांडे यांची बहुतांश पुस्तके वाचली आहेत. त्याचप्रमाणे विविध भाषांमधील अनुवादित पुस्तके वाचण्यावरही भर असतो. वेळेचा सदुपयोग करताना आणि आवड जपण्यासाठी आता कालानुरुप इंटरनेट, मोबाइल, यूट्यूब या माध्यमांचाही वापर करण्याकडे माझा कल असतो. वाचन आणि चित्रपट, डॉक्युमेंट्रीज किंवा इतर व्हिडिओज पाहिल्याने विचारांना बळकटी येते, माहिती मिळते. कोणतीही नवीन गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता वाढते. त्यामुळे मिळेल त्या वेळेत आवड जपण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे वालावलकर यांनी सांगितले. तरुण पिढीही त्यांच्या आवडीनिवडी जोपासतात. माझ्या मुलासदेखील नवनवीन खाद्यपदार्थ बनवायची आवड आहे. त्यामुळे त्याच्या आवडीस पाठबळ देण्याकडेही माझा कल असतो.

 – शब्दांकन : गौरव अहिरे

The post चित्रपट, वाचनाने विचारांना दिशा appeared first on पुढारी.