चुलत भाऊच निघाला वैरी, जमीनीच्या वादातून ‘उत्तर महाराष्ट्र केसरी’ची हत्या

भूषण लहामगे हत्या www.pudhari.news

नाशिक | इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा- दोन दशकांपूर्वी उत्तर महाराष्ट्र केसरीचा मान मिळवलेल्या कुस्तीपटू भूषण लहामगे (४५, रा. सांजेगाव) यांचा नाशिक-मुंबई महामार्गावरील राजूर फाटा परिसरात निर्घृण खून केला. कारमधून आलेल्या मारेकऱ्यांनी भूषण यांच्यावर कोयत्याने वार व गोळीबार करून हत्या करीत पळ काढला. या प्रकरणी वाडिवऱ्हे पोलिस तपास करीत आहेत.

भूषण लहामगे हे शुक्रवारी (दि. १०) सायं. ४.३० च्या सुमारास महामार्गावरून घराकडे जात होते. त्यावेळी एमएच १५, ई ७६७४ क्रमांकाच्या कारमधून आलेल्या मारेकऱ्यांनी दुचाकीवरून जाणाऱ्या भूषण यांच्यावर हल्ला केला. दुचाकीवरून खाली पडलेल्या भूषण यांच्या डोक्यावर, पोटात कोयत्याने वार केले. या हल्ल्यात वर्मी घाव बसल्याने भूषण रक्तबंबाळ झाले. त्यानंतर हल्लेखोरांनी कारमधून मुंबईच्या दिशेने पोबारा केला. ग्रामस्थांनी तातडीने भूषण यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी वाडिवऱ्हे पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

चुलत भाऊच निघाला वैरी

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात जमीन आणि पैशाच्या वादातून चुलत भाऊ वैभव यानेच त्याच्या साथीदारासह भूषण लहामगे यांचा घात केल्याचे समोर आले आहे.

उत्तर महाराष्ट्र केसरी!

भूषण यांच्या नातलगांनी दिलेल्या माहितीनुसार, ते कुस्तीपटू होते. १९९८ ते २००० या कालावधीत त्यांनी कुस्तीच्या राज्यस्तरीय स्पर्धा खेळल्या. तसेच ‘उत्तर महाराष्ट्र श्री’ हा किताबही पटकावला होता. ६५ किलो वजनी गटात त्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत देखील प्रतिनिधित्व केले. त्यामुळे राज्यभरात भूषण यांची ख्याती होती. भूषण यांच्या पश्चात पत्नी, चार कन्या व दोन बंधू असा परिवार आहे.

घराकडे परतताना हल्ला

भूषण यांचा दुधविक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे म्हशी असून, विवाहानंतर त्यांनी व्यवसायाकडे पूर्ण वेळ लक्ष दिले होते. नेहमीप्रमाणे म्हशींना खाद्य आणण्यासाठी ते दुचाकीवरून नाशिकला आले होते. खाद्य घेतल्यानंतर ते पाथर्डी फाटा येथे ओळखीच्या व्यक्तीच्या वास्तुशांतीस हजर राहिले. तेथे जेवण करून ते घराकडे परतत होते. मात्र महामार्गावर त्यांच्यावर हल्ला झाला.

हवेत गोळीबार

भूषण लहामगे यांच्यावर मारेकऱ्यांनी गोळीबार केला. मात्र, शवविच्छेदन अहवालात भूषण यांच्या शरीरात कोणतीही गोळी आढळून आली नाही. त्यामुळे भूषण यांनी गोळीबार चुकवल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. गोळीबार झाल्याचा पोलिसांनी दुजोरा दिला आहे.

हेही वाचा –