नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात रस्सीखेच सुरू असतानाच, या जागेसाठी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांच्या नावाची चर्चा सूरू झाल्याने महायुतीत नवा ट्विस्ट आला आहे. नाशिकच्या जागेबाबत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (दि.२७) पुण्यात बैठक बोलावली आहे. दरम्यान, माझे नाव तुम्हीच चर्चेत आणले. भुजबळ कुटुंबाला उमेदवारी पाहिजे, अशी मागणी नसल्याचे सांगत, शिवसैनिकांनी अस्वस्थ होऊ नये, असा सल्ला भुजबळांनी दिला आहे. मीदेखील तुमच्यातून आलोय, असे सांगत, उमेदवारीच्या स्पर्धेत असल्याचे संकेतही भुजबळांनी दिले आहेत.
नाशिकच्या जागेसाठी शिवसेनेच्या शिंदे गटाचा मूळ दावा असताना, भाजप आणि त्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेदेखील हक्क सांगितल्यामुळे राजकीय वादाला तोंड फुटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र तथा शिंदे गटाचे युवा नेते खासदार श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंची उमेदवारी परस्पर जाहीर केल्यामुळे भाजपसह अजित पवार गटात अस्वस्थता आहे. त्यात ही जागा शिंदे गटालाच मिळावी, यासाठी दोन दिवसांपूर्वी हेमंत गोडसे यांनी पालकमंत्री दादा भुसेंसह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केल्यामुळे महायुतीतील संघर्ष अधिकच विकोपाला गेला. शिंदे गटाच्या शक्तिप्रदर्शनाला भाजपच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रत्युत्तर दिले.
नाशिकच्या जागेसाठी भाजपच कसा योग्य ठरेल, हे पक्षश्रेष्ठींना पटवून सांगत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी नाशिकच्या जागेसाठी दबाव वाढवला आहे. त्यातच नाशिकच्या जागेवर मनसेनेही दावा केला आहे. या संघर्षात आता छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांचेही नाव उमेदवारीसाठी पुढे आल्यामुळे रंगत वाढली आहे. साताराच्या बदल्यात अजित पवार गटाने भाजपकडून नाशिकची जागा मागितली असून, याबाबत भुजबळांनी आपल्या निवडक समर्थकांसह बंद दाराआड चर्चा केल्यामुळे या चर्चेला जोर आला आहे.
दरम्यान, नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातील नेते, पदाधिकाऱ्यांची बैठकदेखील बोलावली आहे. बुधवारी दुपारी १ वाजता पुण्यात अजित पवार गटाची बैठक होणार असून, यात नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा होणार आहे, तर मंत्री छगन भुजबळ यांच्यासह नाशिक लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. महायुतीत आधीच भाजप आणि शिंदे गटात नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच सुरू असताना, आता भुजबळांच्या एन्ट्रीने नवा ट्विस्ट आला आहे.
साताऱ्याच्या बदल्यात जागा मिळावी : भुजबळ
छगन भुजबळ यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना, साताऱ्याची जागा भाजपने घेतली असल्यामुळे त्याबदल्यात राष्ट्रवादीला एक जागा मिळावी, ही चर्चा खरी असल्याचे सांगून, नाशिकच्या जागेवरील चर्चेला बळकटी दिली आहे. जागावाटपाबाबत प्रफुल्ल पटेल, अजित पवारांसोबत बैठक होत आहे. मात्र, आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे शिवसैनिकांनी अस्वस्थ होण्याचे कारण नाही. मीदेखील तुमच्यातूनच आलोय असे सांगत, लढण्याचेही संकेत दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री शिंदेंकडे नगरविकास खाते असून, आमचा शाळेचा एक प्लॉट अडकला आहे. त्या संदर्भात त्यांची भेट घेतली असल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले आहे. मनसेबाबत भुजबळ म्हणाले की, मनसे महायुतीमध्ये आल्यामुळे नाशिकच्या जागेचा कुठेही पेचप्रसंग निर्माण झालेला नाही. उलट आमची शक्ती वाढणार आहे. ते अडचण निर्माण करण्यासाठी आलेले नाहीत. राज ठाकरे यांची वरच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. महादेव जानकर हे महायुतीमधून लढणार आहेत. माझी चर्चा झाली आहे. ते कुठल्या जागेवरून लढणार त्याची चर्चा सुरू आहे, असे भुजबळ म्हणाले.
माझे नाव तुम्हीच चर्चेत आणले. पण याबाबत तिन्ही पक्षांचे नेते मिळून निर्णय घेतील. काय रुसवे आहे, नाराजी आहे याबाबत चर्चा होईल. कोणी मुंबईमध्ये गेले, मागणी केली, त्याचा गोषवारा घेतला जाईल. तसेच भुजबळ कुटुंबाला उमेदवारी पाहिजे अशी माझी मागणी नाही. – छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठामंत्री
हेही वाचा :
- Bell layoffs : जागतिक बेल कंपनीचा मोठा निर्णय; १० मिनिटाच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ४०० कर्मचाऱ्यांना नारळ
- नांदगाव परधडी शिवारात सापडला बेवारस पुरुषाचा मृतदेह
- Sonam Wangchuk Fast Over : ‘लडाखसाठी लढा सुरूच राहणार’, सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे
The post छगन भुजबळ नाशिकच्या मैदानात उतरणार? महायुतीत नवा ट्विस्ट appeared first on पुढारी.