छाननीचे पाच दिवस : कोट्यवधींचे घबाड आले समोर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील आठ शासकीय कंत्राटदारांच्या कार्यालये व निवासस्थानी आयकर विभागाच्या पथकाने छापे टाकले. पाच दिवसांच्या या छापासत्रात आयकर विभागास सुमारे ८५० कोटी रुपयांचे बेहिशेबी व्यवहार, कागदपत्रे आढळल्याचे समजते. तसेच खासगी लॉकर्समध्ये सुमारे सहा कोटी रुपयांची रोकड व तीन कोटी रुपयांचे सोन्याचांदीचे दागिनेही आढळले आहेत. (Income Tax Raid)
मंगळवारपासून शहरातील शासकीय कंत्राटदारांच्या कार्यालये, घरांवर आयकर विभागाने छापे मारले. विभागाने पाच दिवस छाननी केल्यानंतर येथून बेहिशेबी मालमत्ता व व्यवहार आढळले आहेत. कंत्राटदारांनी शासकीय, खासगी बँकांमध्ये तसेच लॉकरमध्ये रोकड व दागिने ठेवल्याचे आढळले, तर कर्मचाऱ्यांच्या घरात व्यवहारांची कागदपत्रे लपवल्याचे आढळून आले.
खबरदारी घेतली, तरी पकडला
आठपैकी एका कंत्राटदाराकडे काही महिन्यांपूर्वीच जीएसटी विभागाने छापे टाकले होते. त्यानंतर पुन्हा पकडले जाऊ नये, यासाठी संबंधिताने सावधगिरी बाळगली होती. त्याने त्याचे बेहिशेबी व्यवहारांची कागदपत्रे, रोकड कर्मचाऱ्याच्या घरी, नातलगांकडे व काही मित्रांकडे ठेवले होते. मात्र आयकर विभागाने तेदेखील शोधून कंत्राटदाराचे पितळ उघड पाडले. (Income Tax Raid)
महापालिकेसह राज्यभरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारे राज्य मार्ग, उड्डाणपूल, शासकीय निवासस्थानांचे वसाहतींचे काम करण्याचे कंत्राट या कंत्राटदारांनी घेतल्याचे समजते. यात ५० ते ५०० कोटी रुपयांपर्यंतच्या कामांचा समावेश आहे. या कंत्राटदार कंपन्यांनी दोन ते तीन वर्षांपासून आयकर चोरी केल्याचेही समजते. त्यामुळे आयकर विभागाने एकाच वेळी संशयित कंत्राटदारांकडे छापे टाकून आयकर चोरी, बेहिशेबी मालमत्ता व व्यवहार उघडकीस आणले.

The post छाननीचे पाच दिवस : कोट्यवधींचे घबाड आले समोर appeared first on पुढारी.