पंतप्रधान मोदींच्या नाशिक दौऱ्यावर ३५ कोटींचा खर्च

मोदींचा नाशिक दौरा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा संमेलनाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी रस्ते डांबरीकरण, रंगरंगोटीवर महापालिकेने तब्बल ३५ कोटींचा खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. हा खर्च शासनाकडून वसुल करण्यासाठी बुधवारी(दि.७) झालेल्या महासभेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला. दरम्यान, शासनाने निधी न दिल्यास पालिकेच्या तिजोरीतून हा खर्च केली जाणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी अवघे शहर सजविण्यात आले होते. यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमापूर्वी आठवड्यातून दोनवेळा घाईत नाशिकचा दौरा करत नियोजनात कोणतीही कसूर राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या आदेशांनंतर महापालिका प्रशासनाने शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, गरज असेल तेथे डांबरीकरण करणे, थर्मल पेंट, स्वच्छतागृहांची साफसफाई रंगरंगोटी, गोदा घाटाची स्वच्छता, रंगरंगोटी, विद्युत रोषणाई आदी कामे अवघ्या दोनच दिवसात पूर्ण केली. यशस्वी नियोजनाबद्दल महापालिकेला शाबासकीची थापही मिळाली. मात्र आता या कामांची देयके महापालिकेला प्राप्त झाली असून बांधकाम विभागाचा खर्च ३५ कोटींवर गेला आहे.

पंचवटीतच २० कोटींचा खर्च

श्री काळाराम मंदिर परिसर, रामकुंडावरील गोदाआरती तसेच तपोवनातील मोदींच्या सभास्थळासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला. काळाराम मंदिर ते रामकुंड येथील बॅरकेटींग, दुर्तफा रंगरंगाेटी व सजावटीसाठी ४० लाख, या दोन्ही ठिकाणी मंडप, स्टेज, पडदे, ग्रीन कारपेट व इतर आवश्यक कामांसाठी २५ लाख, वस्त्रांतरगृह व काळाराम मंदिर रंगरंगोटीसाठी १८ लाख, या परिसरात येणाऱ्या रस्त्यांची दुरूस्ती, सजावटीसाठी १ कोटी असा खर्च झाला आहे. साधारण २० कोटींचा खर्च केवळ पंचवटी परिसरातील विविध कामांसाठी झाला आहे.

‘रामायणा’वर एक कोटींचा खर्च

रामकुंड ते काळाराम मंदिर, काट्या मारूती चौक ते आडगाव नाका भिंतीवर ७५ लाख तर तपोवन कॉर्नर ते चव्हाण मळा, मनपाचा बस डेपो, बस टर्मिनल भितींवर २५ लाख असे रामायणाचे दृश्य साकारण्यासाठी १ कोटीचा खर्च केला आहे.

हेही वाचा

The post पंतप्रधान मोदींच्या नाशिक दौऱ्यावर ३५ कोटींचा खर्च appeared first on पुढारी.