मुंबई नाका चौकातही सिग्नल बसविणार

मुंबई नाका नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुंबई-आग्रा महामार्गावरील वर्दळीच्या मुंबई नाका चौकातील वाहतूक बेटाचा घेर कमी केल्यानंतर येथील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी आता द्वारकाच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी १८ लाखांचा खर्च केला जाणार आहे. रस्ता सुरक्षा समितीच्या शिफारशीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरात व्दारकापाठोपाठ मुंबई नाका चौकात सातत्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न भेडसावत आहे. दररोज सायंकाळी ५ ते ७ या दरम्यान या परिसरातून मार्गक्रमण करण्यासाठी वाहनधारकांना तासन‌्तास‌ रांगेत उभे राहावे लागते. यावर तोडगा काढण्यासाठी रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून खल सुरू आहे. मात्र अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. द्वारका सर्कलचा घेर कमी करून या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे; परंतु त्या ठिकाणची कोंडी अद्यापही कायम आहे. तर त्याच धर्तीवर आता वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुंबई नाका सर्कलचा घेर कमी केला जात आहे. या ठिकाणा महात्मा फुले, सावित्रीबाई फुले दाम्पत्यांचा ब्रान्झ धातुचा पुतळा बसविला जात असून, त्या कामानिमित्त या ठिकाणी सर्कलचा घेरही कमी केला जात आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात न्हाई आणि रस्ते सुरक्षा समितीनेही मुंबई नाका येथील सर्कलचा घेर कमी करून या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची शिफारस केली आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव पालिकेच्या बांधकाम विभागाला प्राप्त झाल्यानंतर बांधकाम विभागाने या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्याच्या प्रक्रियेला वेग दिला आहे. त्यासाठी १८ लाखांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी निविदा प्रसिद्ध केली असून, महिनाभरात या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याने या ठिकाणची वाहतूक कोंडी कमी होईल, असा दावा केला जात आहे.

सर्वेक्षणाचा निर्णय रद्द

मुंबई नाका चौकातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना सुचविण्याकरिता आयआयटी पवईच्या माध्यमातून या चौकातील वाहतुकीचे सर्वक्षण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र आता या चौकातील वाहतूक बेटाचा घेर कमी करून सिग्नल यंत्रणा बसविली जात असल्यामुळे सर्वेक्षणाचा निर्णय तूर्त रद्द करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post मुंबई नाका चौकातही सिग्नल बसविणार appeared first on पुढारी.