कांदा निर्यातबंदी विरोधात देवळ्यातील पाचकंदील येथे रास्ता रोको

देवळा : पुढारी वृत्तसेवा ;  कांदा निर्यात बंदी मुळे कांद्याचे दर घसरले असून केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी तत्काळ मागे घ्यावी या मागणीसाठी शुक्रवारी (दि. ९ )  दुपारी दीड वाजता देवळा येथे पाचकंदीलवर स्वंतत्र भारत पक्षाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष प्रवीण आहिरे, शेतकरीसंघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र कापडनिस, देवळा तालुका अध्यक्ष माणिक निकम यांच्या नेतृवत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आला.

जवळपास अर्धा ते पाऊण तास सुरु असलेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे देवळा नाशिक मार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झाली होती. पोलीस उपनिरीक्षक डी. पी. काळे यांना निवेदन देण्यात येऊन आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव, प्रवीण आहिरे, शैलेंद्र कापडनिस, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, देविदास आहेर, विनोद आहेर आदींनी शेतकरी विरोधी धोरण असल्याचा आरोप करीत केंद्र सरकारवर सडकून टीका केली. गतवर्षी ८ डिसेंबरला कांदा निर्यात बंदीचा आदेश जारी केला. त्यानुसार शेतकऱ्यांना ३१ मार्च २०२४ पर्यंत कांद्याची निर्यातबंदी केली आहे. मात्र कांदा निर्यात बंदी केल्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सद्यस्थितीत उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. याआधी कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लादून जवळपास अघोषित निर्यात बंदी लादली आहे. त्यातून सावरत कांद्याला योग्य दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली असताना केंद्र सरकारने पुन्हा कांदा निर्यात बंदी करुन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणले. या संदर्भात केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली आहे. असा आरोप यावेळी करण्यात आला.

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कांदा उत्पादक शेतकरी असून सत्ताधारी केंद्र व राज्य सरकारमधील मंत्री, खासदार व आमदार आदी लोकप्रतिनिधींनी शेतमालाच्या कोसळलेल्या भावाबाबत मौन बाळगले आहे. कांदा निर्यात बंदी मागे न घेतल्यास येऊ घातलेल्या निवडणुकीत शेतकरी त्यांना त्यांची जागा दाखवून देतील अशा पद्धतीने नाराजी व्यक्त केली. याची सरकारने दाखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली. विविध मागण्याचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. आंदोलनात शेतकरी संघटनेचे देवळा तालुका उपाध्यक्ष किरण निकम, डॉ. राजेंद्र ब्राह्म्णकर, शिवसेना उबाठा गटाचे नंदू जाधव, विलास शिंदे आदींसह  स्वप्नील आहेर, संदिप निकम, मनोज आहेर, विशाल निकम, हेमंत निकम, तानाजी निकम, कैलास कोकरे, माधव निकम, हरिचंद्र निकम, विठ्ठल महाजन, केदा निकम आदी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा :

The post कांदा निर्यातबंदी विरोधात देवळ्यातील पाचकंदील येथे रास्ता रोको appeared first on पुढारी.