राजापूरला विहिरींनी गाठलाय तळ; ग्रामस्थ जानेवारीतच पाणीटंचाईने हैराण

Tanker pudhari.news

नाशिक (राजापूर, ता. येवला) : लक्ष्मण घुगे
येवला तालुक्याच्या पूर्व भागात असलेले राजापूर गाव वर्षभरापासून पाणीटंचाईचा सामना करत आहे. स्थानिकांसह जनावरांची तहान टँकरच्या पाण्यावर भागवली जाते आहे. आता गावासह वाड्या-वस्त्यांवर टंचाईच्या झळा तीव्र झाल्याने सध्या दररोज तीन टँकरने होणारा पाणीपुरवठा वाढविण्याची मागणी होत आहे. (Water supply scheme)

गतवर्षी समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाली नाही. परिणामी, भूजल पातळी खालावली आहे. विहिरींनी तळ गाठला. हाताला कामही नसल्याने मोठे संकट ओढवले आहे. राजापूर गाव आणि वाड्या-वस्त्या मोठ्या असल्याने पाणीपुरवठ्याचे नियाेजन करताना ग्रामपंचायतीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. एक टँकरच्या माध्यमातून एका वस्तीला दहा ते पंधरा दिवसांनी पाणी दिले जात आहे. वाड्या-वस्त्यांवरील कूपनलिका, विहिरी कोरड्याठाक पडल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. राजापूर हे गाव शासन दरबारी टँकरमुक्त म्हणून नोंद आहे. या गावाला आतापर्यंत खैराबाई लोहशिंगवे येथून पाणीपुरवठा योजना (Water supply scheme) कार्यान्वित असून, तेथील विहिरीचे पाणी आटले आहे. वडपाटी पाझर तलावजवळील पाणीपुरवठा याेजनेच्या विहिरीनेही तळ गाठल्याने राजापूरवासीयांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. शासनाने राजापूरसाठी पाणी टँकरच्या फेऱ्या वाढवून द्याव्यात अन्यथा महिलावर्ग आक्रमक पवित्रा घेतील, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य सुभाष वाघ व भाजपचे कार्यकर्ते दत्ता सानप आदींनी दिला आहे.

दुष्काळ त्यात रोजगाराचा प्रश्न
राजापूर गावाच्या पाचवीलाच पाणीटंचाई पुजलेली आहे. येवला तालुक्याच्या पूर्व भागासाठी नांदूरमध्यमेश्वर (ता. निफाड) येथून पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या सुरू आहे. राजापूरसह ४१ गाव पाणीपुरवठा योजनेचे (Water supply scheme) काम प्रगतिपथावर सुरू असून, ही योजना कार्यान्वित होण्यासाठी अजून किमान वर्ष लागणार आहे. तोपर्यंत टंचाईच्या झळा सोसण्याशिवाय पर्याय नाही. राजापूर येथे आतापर्यंत राबविलेल्या पाणीपुरवठा योजना या कुचकामी ठरत आहे. कारण या भागातील विहिरी या आठमाही ठरत आहेत. निसर्गाच्या भरवशावर स्थानिकांचे सर्व जीवनमान अवलंबून आहे. या भागात सिंचनाची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने रोजगाराचा प्रश्नही गहण झाला.

The post राजापूरला विहिरींनी गाठलाय तळ; ग्रामस्थ जानेवारीतच पाणीटंचाईने हैराण appeared first on पुढारी.