सिन्नर सत्कारप्रसंगी बडगुजर यांचे हेमंत गोडसेंवर वाग्बाण

सिन्नर सेना pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक लोकसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला असून, यंदाही आपलाच उमेदवार निवडून येईल, ही काळ्या दगडावरची रेष आहे. पक्षाशी बेइमानी करणाऱ्यांवर तोंड लपवत फिरण्याची वेळ आली असून, मतदारच त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी हेमंत गोडसे यांच्यावर वाग्बाण सोडले.

सिन्नर तालुका शिवसेना ठाकरे गटाकडून नवनियुक्त जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, लोकसभा संघटक विजय करंजकर व महानगरप्रमुख विलास शिंदे यांचा सत्कार सोहळा शनिवारी (दि. 9) पार फडला. नर्मदा लॉन्स येथे झालेल्या या साेहळ्याप्रसंगी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी बडगुजर बोलत होते.

सुधाकर बडगुजर म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी अनेकांना मोठे केले. सक्षम उमेदवारांची मोठी फळी असूनही एकदा नव्हे, तर दोनदा विश्वास टाकला. परंतु त्यांनीच पक्षाशी गद्दारी केल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट असल्याचे ते म्हणाले. विजय करंजकर यांनी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात आज शिवसेनेच्या शाखा दिसतात याचे कारण लोकांचा उद्धव ठाकरे यांच्या कार्यावर असलेली अपार श्रद्धा हेच आहे. वाजे यांनी बोलताना पक्ष मजबुतीसाठी शिवसैनिक अधिक जोमाने कामाला लागले असून, गद्दारी करणाऱ्यांना कार्यकर्ते पळता भुई थोडी करतील, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी नीलेश शिंदे, गौरव घरटे, प्रवीण गडाख, किरण कोथमिरे, सोमनाथ तुपे, अरुण वाघ, पिराजी पवार, किरण डगळे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

लोकसभा ही सत्त्वपरीक्षा
यंदाची लोकसभा ही मविआसाठी त्यातही विशेष करून ठाकरे गटासाठी सत्त्वपरीक्षा आहे. आपल्यासाठी एकेक जागा महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन सुधाकर बडगुजर यांनी केले. तसेच गद्दारांना धडा शिकविण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे. त्यामुळे या उमेदवाराचे अवसानच गळाले असून, आता तो मतांसाठी गयावया करताना दिसतो आहे, असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षरीत्या गोडसे यांना लगावला.

हेही वाचा:

The post सिन्नर सत्कारप्रसंगी बडगुजर यांचे हेमंत गोडसेंवर वाग्बाण appeared first on पुढारी.