नाशिक महापालिकेचे ई-चार्जिंग स्टेशन्स लालफितीत

चार्जिंग स्टेशन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- केंद्र शासनाच्या इलेक्ट्रीक वाहन धोरणाला नाशिक महापालिकेकडून खो घातला जात असून, शहरात प्रस्तावित १०६ इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग स्टेशन्सपैकी पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आलेल्या २० चार्जिंग स्टेशन्सची उभारणी लालफितीत अडकली आहे. चार्जिंग स्टेशन्सच्या उभारणीसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेचे संचिका गेल्या काही महिन्यांपासून धुळखात पडली आहे. यासाठी केंद्राच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमां(एन-कॅप)अंतर्गत प्राप्त दहा कोटींचा निधीही शासनाकडे परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्र शासनाने पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी तसेच पारंपरिक इंधनामुळे होणाऱ्या प्रदूषणमुक्तीसाठी इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. इलेक्ट्रीक वाहनांना चार्जिंगसाठी ई-चार्जिंग स्टेशन्सची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी नॅशनल क्लिन एअर पॉलिसी अर्थात एन-कॅपअंतर्गत केंद्र शासनाने निधी देऊ केला आहे. ई-चार्जिग स्टेशन्सकरीता महापालिकेने शहरात १०६ जागा निश्चित केल्या आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २० ठिकाणी ई-चार्जिंग स्टेशन्सची उभारणी केली जाणार आहे. याकरीता महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. निविदा सादर करण्यासाठी ३० मे पर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत निना हॅण्डस्, मरिन इलेक्ट्रीकल्स प्रायव्हेट लिमिटेड, टेस्को चार्ज झोन लिमिटेड, मावेन कार्पोरेशन, शरिफाय सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, जिवाह इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड तसेच युनिक एंटरप्रायझेस या सात कंपन्यांच्या निविदा सादर झाल्या. मात्र त्यानंतर ही निविदा प्रक्रिया थंड बस्त्यात टाकण्यात आली. प्राप्त निविदांचे मूल्यमापन सुरू असल्याचे कारण संबंधितांकडून दिले जात असले तरी यामागे अर्थकारणाचीच चर्चा अधिक आहे. मात्र या विलंबामुळे शासनाकडून प्राप्त झालेला एन-कॅपचा निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या ठिकाणी होणार चार्जिंग स्टेशन्स!

केंद्र शासनाच्या एन-कॅप योजनेअंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात मुख्यालय राजीव गांधी भवन, पश्चिम विभागीय कार्यालय, पूर्व विभागीय कार्यालय, नाशिकरोड विभागीय कार्यालय, सातपूर विभागीय कार्यालय, पंचवटी विभागीय कार्यालय, सिडको विभागीय कार्यालय, तपोवन बस डेपो, अमरधाम फायर स्टेशन पंचवटी, सातपूर फायर स्टेशन, राजे संभाजी स्टेडीअम सिडको, बिटको हॉस्पीटल, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक, बी. डी. भालेकर मैदान, प्रमोद महाजन उद्यान, महात्मा नगर क्रिकेट मैदान, दादासाहेब फाळके स्मारक, गणेशवाडी भाजी बाजार इमारत, लेखानगर मनपा जागा, अंबड लिंकरोडवरील मनपा मैदान या २० ठिकाणी चार्जिंग स्टेशन्सची उभारणी केली जाणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक महापालिकेचे ई-चार्जिंग स्टेशन्स लालफितीत appeared first on पुढारी.