श्री शिव महा पुराण कथा उत्सवाच्या गर्दीत चोरट्यांनी मारला हात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पाथर्डी फाटा परिसरात शिवभक्त पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिव महा पुराण कथा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास लाखो भक्तांची गर्दी होत असून त्यात चोरट्यांचीही गर्दी असल्याचे उघड झाले आहे. मंगळवारी (दि.२१) कथा उत्सवाच्या पहिल्या दिवशी चोरट्यांनी १० हून अधिक महिलांच्या गळ्यातील सुमारे २१ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाशिवपुराण कथा उत्सवास शहर, जिल्हाभरातून भाविक सहकुटूंब उपस्थित राहत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक वर्गाची गर्दी झाली आहे. या गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेण्यास सुरुवात केल्याचे दिसते. गर्दीत हातचलाखीने महिला, पुरुषांकडील सोन्याचे दागिने चोरटे चोरत आहेत. इंदिरानगर पोलिस ठाण्यात स्वाती दिलीप आहेरराव (रा. पाथर्डी फाटा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या परिसरातील महिलांसह कथा उत्सवात सहभागी झाल्या होत्या. सकाळी ११ च्या सुमारास कार्यक्रमाच्या मंडपातील महिला कक्षात जाण्यासाठी रांगेत उभ्या असताना चोरट्याने ७५ हजार रुपयांचे ३०.४१० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. दरम्यान, स्वाती आहेरराव यांच्यासोबतच इतर महिलांच्या दागिन्यांवरही चोरट्यांनी डल्ला मारल्याचे उघड झाले. तर काही महिला बाहेरगावच्या असल्याने किंवा कमी वजनाचे दागिने चोरीस गेल्याने त्यांनी तक्रारी न करताच घरी गेल्याचे सुत्रांनी सांगितले.

साध्या वेशात पोलिस तैनात

शिवमहापुराण कथा कार्यक्रमाच्या मांडवासह परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तैनात आहे. आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेची पथकेही बंदोबस्तात आहेत. संशयित व्यक्तींवर नजर ठेवली जात आहे. साध्या वेशात पोलिस बंदोबस्त तैनात आहे. नागरिकांनीही खबरदारी घ्यावी. – नितीन पगार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, इंदिरानगर

यांचेही दागिने लंपास

महिलांचे नाव व पत्ता —- दागिन्यांचे वजन

सोनाली हितेश अमृतकर (रा. वासननगर) —- १३ ग्रॅम

कल्पना शशिकांत कुमटेकर (रा. रविवार पेठ) —- १२ ग्रॅम

शोभा पुरुषोत्तम मते (रा. गंगापूर रोड) —- पोत

वर्षा वसंत पवार (रा. सिडको) —- १८ ग्रॅम

सरला भिकाजी लिंगाईत (रा. इंदिरानगर) —- १५ ग्रॅम

अश्विनी शंकर वराडे (रा. पंचवटी) —- सोन्याची शॉर्ट पोत

छाया योगेश मटाले (रा. कामटवाडा) —- २५

ग्रॅम पुष्पा रमेश कानकाटे (रा. श्रीकृष्णनगर, पंचवटी) —- १७ ग्रॅम

शोभा बहिरू जावळे (रा. हरसुल) —- १५ ग्रॅम

शशिकला प्रकाश रावते (रा. अंबरनाथ) —- १६ ग्रॅम

अरुणाबाई नाना पाटील (रा. नाशिकरोड) —- १४ ग्रॅम

विजया दादा बरे ( रा. पाथर्डी फाटा) —- १७ ग्रॅम

शिरीषकुमार तानाजी चव्हाण —- २५ ग्रॅम

The post श्री शिव महा पुराण कथा उत्सवाच्या गर्दीत चोरट्यांनी मारला हात appeared first on पुढारी.