होळकर पुलाखालील मेकॅनिकल गेट कामासाठी ३१ मे चा अल्टिमेटम

गांधी तलाव नाशिक pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गोदावरी नदीपात्रात अहिल्यादेवी होळकर पुलाखाली स्मार्ट सिटी अभियानांतर्गत बसविण्यात येणाऱ्या मेकॅनिकल गेटचे काम येत्या ३१ मे पूर्वी पूर्ण करायचा अल्टिमेटम ठेकेदाराला दिल्यानंतर स्मार्ट कंपनीने या कामासाठी गांधी तलावातील पाणीप्रवाह थांबविण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ सुमंत मोरे यांनी मनपाच्या बांधकाम विभागाला पत्र लिहून गांधी तलावातील पाणी प्रवाह थांबवून रिकामा करण्याची सूचना केली आहे. हे काम तीन महिने चालणार आहे.

गोदावरी नदीचा पूरप्रभाव कमी करण्यासाठी तसेच पूरस्थिती नियंत्रणासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून होळकर पुलाखाली २२ कोटी रुपये खर्चातून मेकॅनिकल गेट बसविण्यात येत आहेत. २०१९ मध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता; परंतु ठेकेदाराच्या संथ कामामुळे हा प्रकल्प रेंगाळला. स्मार्ट सिटी कंपनीने ठेकेदाराला वारंवार सूचना करूनही ठेकेदाराने कामात सुधारणा केली नाही. त्यामुळे स्मार्ट कंपनीने ठेकेदाराला ३१ मे २०१४ पूर्वी काम पूर्ण करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर ठेकेदाराने आता गांधी तलावातील पाण्याचे कारण पुढे केले आहे. गोदावरीचा प्रवाह सुरू असून, गांधी तलाव पाण्याने भरला असल्याने या ठिकाणी काम करता येत नसल्याचा ठेकेदाराचा दावा आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीने महापालिकेच्या बांधकाम विभागाला पत्र लिहून गांधी तलावातील पाण्याचा प्रवाह बंद करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे तीन महिने तलावातील प्रवाह बंद ठेवला जाणार आहे.

९० दिवस पाणीप्रवाह थांबणार
होळकर पुलाखाली मेकॅनिकल गेट बसविण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे तीन महिने पाणी प्रवाह बंद ठेवण्याची मागणी आहे. स्मार्ट सिटी कंपनीने १५ मार्च रोजी पालिकेला पत्र पाठविले आहे. त्यानुसार पुढील तीन महिने गृहीत धरले तर, जूनअखेरपर्यंत हे काम चालणार असल्यामुळे एवढे दिवस प्रवाह थांबवून गांधी तलाव कोरडा कसा ठेवायचा असा पेच पालिकेसमोर पडला आहे.

साडेचार वर्षांपासून रखडले काम
हे काम पूर्ण करण्यासाठी ६ डिसेंबर २०२१ ची मुदत देण्यात आली होती. परंतु, कार्यारंभ आदेश देऊन साडेचार वर्षे झाली तरी, पुलाखाली मेकॅनिकल गेट बसविण्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. या मेकॅनिकल गेटमुळे पुराच्या पाण्याचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होऊन होळकर पुलाच्या पुढील बाजूस येणारा पूर काही प्रमाणात नियंत्रित करणे शक्य झाले असते, परंतु स्मार्ट सिटी व ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे हे कामदेखील अजूनही अपूर्णच आहे.

हेही वाचा:

The post होळकर पुलाखालील मेकॅनिकल गेट कामासाठी ३१ मे चा अल्टिमेटम appeared first on पुढारी.