जागतिक वस्तुसंग्रहालय दिनानिमित्त आज सावानामध्ये मोफत प्रवेश

नाशिक : निल कुलकर्णी

शहरातील प्राचीन वस्तू, दस्तावेज आणि संपन्न वारशाचा ठेवा असणाऱ्या पाचही वस्तुसंग्रहालयांत शालेय विद्यार्थी आणि तरुणाईची गर्दी दिवसेंदिवस वाढत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. लहान मुले, शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन तरुणाईसाठी हा अनमोल ठेवा प्रत्यक्ष डोळ्यात साठवण्यासाठी अधिक कल असल्याची माहिती शहरातील संग्रहालयप्रमुखांनी दिली.

बुद्ध मूर्ती www.pudhari.news

१९७७ पासून १८ मे हा दिवस जागतिक वस्तुसंग्रहालय दिन म्हणून साजरा केला जाताे. ‘शिक्षण आणि संशोधनासाठी संग्रहालय’ ही यंदाच्या दिनाची संकल्पना आहे. संग्रहालये हे केवळ प्राचीन, दुर्मीळ आणि चमत्कारिक वस्तू, ठेवा यांचा संग्रह नसून, ती शिक्षण आणि संशोधनाची प्रमुख केंद्रेही असतात. शालेय मुले, चित्र, शिल्प आदी ललित कला शिकणारे महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच इतिहासप्रेमी यांच्यासह नागरिकांनाचा संग्रहालये पाहण्याकडे ओढा वाढत असल्याची माहिती शहरातील संग्रहालयाच्या प्रमुखांनी दिली.

ध्वनी तरंग काढणारी अजब घंटी बुद्ध मूर्ती www.pudhari.news
ध्वनी तरंग काढणारी अजब घंटी बुद्ध मूर्ती

सावानाच्या प्राचीन वस्तुसंग्रहालयात लेखन कलेतील उगमकाळातील साहित्य, दौत, टायपरायटर, लेखणीचे प्रकार आहेत. यासह, काच चित्रे, पाषाण आणि काष्ठ शिल्पे, गंजिफा, मिश्र धातू देवमूर्ती, शिवकालीन शस्त्रे, दारूगोळा, चिलखत, कट्यार धातूच्या इतर वस्तू, लामण दिवे, पुरातत्त्व अभिलेख, नाणे, तिकिटे, दुर्मीळ चित्रे, मूर्ती, यज्ञ संकल्पना, नाशिकची संपन्न साहित्य परंपरा यांचा अनमोल संग्रह ठेवलेला दिसतो.

तिबेटीयन देवतांच्या मूर्ती www.pudhari.news
तिबेटीयन देवतांच्या मूर्ती

अशाच प्रकारचे शहरातील सरकारवाडा वस्तुसंग्रहालय, अंजनेरी येथील नाणे संग्रहालय, बाळासाहेब ठाकरे संग्राहलय, सिन्नरचे खासगी खनिज व मौल्यवान खडे संग्रहालय, कामटवाडे येथील खासगी संग्रहालयातही समृद्ध वारशाचे जतन करण्यात आले आहे. त्याकडेही विद्यार्थी ज्ञान घेण्यासाठी तसेच इतिहासाचा, निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र आहे. एकूणच नाशिकची संग्रहालये इतिहासाच्या गौरवखुणा देण्यासह शिक्षण आणि संशोधनाची महत्त्वाची केंद्र होऊ पाहात आहेत.

सावाना वस्तुसंग्रहालयात शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रवेश असतो. त्यामुळे येथील दुर्मीळ खजिना पाहायला येणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढत आहे. अनेक संशोधक प्राचीन वस्तूंच्या अभ्यासासाठी आणि संशोधनासाठीही वारंवार येथे भेटी देऊन ज्ञानार्जन करत आहेत. जागतिक संग्रहालय दिनाचे औचित्य साधून सावाना वस्तुसंग्रहालयात सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत मोफत प्रवेश दिला जाणार आहे. – प्रेरणा ध. बेळे, सचिव, वस्तुसंग्रहालय, सावाना

समाजाला आकार, संग्रहालयाची मूल्य प्रशंसा…
संग्रहालये ही अशी ठिकाणे आहेत, जिथे लोक विविध संस्कृती, इतिहास आणि नैसर्गिक चमत्कारांबद्दल जाणून घेऊ शकतात. ते प्रतिबिंब आणि सर्जनशीलतेसाठी जागादेखील प्रदान करतात. आपण संग्रहालय दिन का साजरा करतो, याचे मुख्य कारण म्हणजे समाजाला आकार देण्यासाठी संग्रहालयांच्या मूल्यांची प्रशंसा करणे. संग्रहालये आपल्याला आपल्या सभोवतालचे जग समजून घेण्यास आणि जगाच्या विविध भागांतील इतर लोकांशी संपर्क साधण्यास मदत करतात.

दुर्मिळ तंत्र मुर्ती www.pudhari.news
दुर्मिळ तंत्र मुर्ती
  • भविष्यातील पिढ्यांसाठी सांस्कृतिक वारसा जतन आणि संरक्षण.
  • विविध संस्कृतींमधील लोकांमध्ये एकता आणि समजूतदारपणा वाढवणारी केेंद्रे.
  • ज्ञानाची देवाणघेवाण आणि जगाच्या समान दृष्टीचा प्रचार करण्यासाठी. संग्रहालये समर्पित.
जॅक्सन वधासाठी हुतात्मा अनंत कान्हेरे यानी वापरलेली पिस्तुल