नाशिकच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकसाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी एकतर्फी जाहीर केल्यानंतर आता या ‘शब्द’पूर्तीसाठी थेट मुख्यमंत्र्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने नाशिकसह दक्षिण मुंबई, ठाणे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा कायम ठेवत यासंदर्भातील उमेदवारांच्या नावांची यादीच भाजपला सादर केली आहे. या चारही जागा जिंकण्यासाठी लागणारे समीकरण आणि योग्य उमेदवार शिवसेनेकडे आहेत, असा युक्तिवाद शिंदे गटातर्फे करण्यात आला आहे. त्यामुळे आता नाशिकची जागा कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खा. शिंदे यांनी नाशिकच्या जागेसाठी गोडसे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. भाजपपाठोपाठ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेदेखील नाशिकवर हक्क सांगितल्याने महायुतीत संघर्ष निर्माण झाला आहे. गोडसे यांनी रविवारी केलेल्या शक्तिप्रदर्शनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी नाशिकच्या जागेसाठी थेट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे नाशिकसह चार मतदारसंघांमध्ये शिंदे गटाकडे सक्षम उमेदवार असल्याचा दावा करत या उमेदवारांच्या नावांची यादीच पाठविली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबईत आले होते. यावेळी शाह आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा झाली होती. त्यात शाह यांनी भाजप मुंबईतील सहापैकी पाच जागा लढवेल, असे स्पष्ट केले होते. तसेच लोकसभेच्या एकूण ३२ मतदारसंघांत आमचेच उमेदवार रिंगणात उतरले, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती. एकनाथ शिंदे यांना या प्रस्तावाला विरोध केला होता. मात्र, नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातील लोकसभेच्या जास्तीत जास्त जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जिंकून येणे हाच उमेदवारीसाठी एकमेव निकष असल्याचे शाह यांनी म्हटले होते. या निकषाचा विचार करता भाजपचे उमेदवार शिंदे गटापेक्षा अधिक सक्षम असल्याचे शाह यांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतरही शिंदे गटाने माघार घेतली नव्हती. आता नाशिकसह मुंबई, ठाणे आणि शिर्डीची जागा लढवण्याबाबत एकनाथ शिंदे अजूनही ठाम आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपला उमेदवारांची यादी पाठवत या जागांवरील हक्क शिंदे गट सोडणार नसल्याचे प्रत्यक्ष संकेतच मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

उद्या महायुतीचे चित्र स्पष्ट होणार

महायुतीचे अंतिम जागावाटप गुरुवारी (दि.२८) जाहीर होणार आहे. त्यानंतरच राज्यातील लोकसभा निवडणुकीचे प्रत्यक्ष चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे. नाशिकमध्ये श्रीकांत शिंदे यांनी परस्पर हेमंत गोडसे यांची उमेदवारी घोषित केल्याने भाजपचे शांतिगिरी महाराज नाराज झाले आहेत. त्यांनी याठिकाणी अपक्ष लढण्याची भूमिका घेतली आहे. त्यातच भाजपसह राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही या जागेवर हक्क सांगितल्याने महायुतीत संघर्ष पेटला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार असावा, यासाठी पक्षाचे स्थानिक नेते गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील आहेत. मात्र, एकनाथ शिंदे हे स्वत: ठाण्यात राहतात. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीने ठाणे लोकसभेची जागा प्रतिष्ठेची आहे. परिणामी, एकनाथ शिंदे ही जागा सोडण्यासाठी तयार नाहीत. दक्षिण मुंबईची जागा भाजपने मनसेला देण्याचे ठरवल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीत जागावाटपाबाबत एकमत झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात अनेक जागांचा तिढा अद्याप कायम असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा –

The post नाशिकच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला? appeared first on पुढारी.