तर भुजबळ विरुद्ध मराठा थेट लढत, उमेदवारी चर्चांमुळे नाशिककडे राज्याचे लक्ष

छगन भुजबळ www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीबरोबरच महाविकास आघाडीकडून दररोज नव्या उमेदवाराचे नाव पुढे येत असल्याने, नाशिकच्या जागेचा पेच वाढता वाढतच आहे. आता महायुतीकडून मंत्री छगन भुजबळ यांचे नाव पुढे आल्यामुळे राजकीय गणिते बदलली आहेत. विशेषत: मराठा समात या मतदारसंघात आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्यामुळे भुजबळ विरुद्ध मराठा समाज असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे.

जेव्हा मराठा आरक्षणावरून सर्वच आमदार, खासदार, मंत्री, राजकीय पक्ष, नेतेमंडळी सावध भूमिका घेत होते, तेव्हा मंत्री भुजबळ मात्र एकाकीपणे मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध करताना दिसून आले. यावेळी त्यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात मोहीमच सुरू केली होती. जरांगे-पाटील यांच्या प्रत्येक विधानाला भुजबळांकडून ‘चेकमेट’ दिला जात होता. सर्व नेते मराठा समाज तसेच जरांगे-पाटील यांच्याविषयी सावध विधाने करीत असताना, भुजबळांनी मात्र उघडपणे टीकेची झोड उठवून दिली होती. अशात आगामी विधानसभा निवडणुकीत भुजबळांचा विजयी मार्ग खडतर करण्याची मोर्चेबांधणीही मराठा समाजाकडून केली जात होती. मात्र, लोकसभेच्या रिंगणातच भुजबळांचे नाव पुढे आल्यामुळे, मराठा समाजाने त्यादृष्टीने भुजबळविरोधी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

नाशिक लाेकसभा मतदारसंघात महायुतीकडून छगन भुजबळांचे नाव निश्चित झाल्यास, मराठा समाजाकडून याठिकाणी अपक्ष उमेदवार देऊन भुजबळांविरोधात संपूर्ण समाज उभा करण्याची रणनीती आखली जात आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात भुजबळ विरुद्ध मराठा समाज असा सामना रंगण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

आज ठरणार मराठा समाजाचा उमेदवार
मराठा समाज ४८ मतदारसंघांत आपले अपक्ष उमेदवार उभे करणार असून, या उमेदवारांच्या नावांची यादी ३० मार्चपर्यंत निश्चित होणार आहे. रविवारी (दि. २४) आंतरवली सराटी येथे झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून, जिल्हास्तरावर बैठका घेऊन त्यात एका मराठा समाजातील व्यक्तीच्या नावावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे. त्यानुसार बुधवारी (दि. २७) नाशिक येथे मराठा समाजाची बैठक होत असून, त्यात उमेदवार निश्चित होणार आहे. दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची चर्चा रंगल्यामुळे त्यांच्या तोडीस तोड उमेदवार देण्याचा मराठा समाजाचा प्रयत्न असणार आहे. त्यानुसार मराठा समाजाकडून समाजातील दमदार उमेदवाराचा शोध घेतला जात आहे.

भाजपकडून विरोधाचा सूर
नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून छगन भुजबळ यांचे नाव पुढे आल्यानंतर भाजपमधून काहीसा विरोधी सूर समोर येत आहे. भाजपच्या प्रदेश स्तरावरील पदाधिकाऱ्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत, ‘तेवढी वाइट वेळ भाजप कार्यकर्त्यांवर येणार नाही.’ असे म्हटले आहे. तर, ‘एका भाजप पदाधिकाऱ्याने मोदींना पंतप्रधान करण्यासाठी भुजबळांना निवडून आणण्याची जबाबदारी आमच्यावर सोपविली जात असेल, तर दुर्दैवच म्हणावे लागेल.’ अशी प्रतिक्रिया नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली आहे.

The post तर भुजबळ विरुद्ध मराठा थेट लढत, उमेदवारी चर्चांमुळे नाशिककडे राज्याचे लक्ष appeared first on पुढारी.