नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चार वर्षांपूर्वी कोरोना विषाणूने जगावर थैमान घातले होते. त्यावेळी या आजारातून जनसामान्यांना वाचविण्यासाठी सर्वच पॅथींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. या काळानंतर मात्र नागरिकांनी सतर्क होत आपल्या नियमित आरोग्य तपासणीला प्राधान्य दिल्याचे समोर आले आहे. त्यातही होमिओपॅथीकडे कल वाढल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.
होमिओपॅथीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १० एप्रिलला जागतिक होमिओपॅथी दिन साजरा केला जातो. ‘आरोग्यम धनसंपदा’ असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. याचा अर्थ ‘आरोग्य हीच आपली धनसंपदा’ आहे. त्यामुळे जनसामान्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अनिवार्य आहे. कोरोना महामारीतील अनुभवानंतर नागरिकांनी आता पूर्वतपासणी, मासिक तपासणी, वार्षिक तपासणी अशा प्रकारात तपासण्या सुरू केल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात ग्रामीण भागातून महिन्याला साधारणपणे सहा ते सात हजार रुग्ण होमिओपॅथीचा लाभ घेत आहेत. यामध्ये सर्वाधिक त्वचा रुग्ण आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आयुष विभागांतर्गत १३ ठिकाणी विशेष कॅम्पचे आयोजन वर्षातून १० ते १२ वेळा करण्यात येत असल्याचे देखील समोर आले आहे.
२०२४ ची थीम
जागतिक होमिओपॅथी दिन २०२४ साठी खास थीम निवडण्यात आली आहे. होमिओपॅथीच्या क्षेत्रात संशोधनावर भर देणे आणि कुशलता वाढवणे ही या वर्षीची थीम आहे. होमिओपॅथीचे सध्याचे संशोधन आणि ही उपचार पद्धती अधिक चांगली होण्यासाठीचा प्रयत्न यावर भर देणारी ही थीम आहे. आरोग्यसेवा सुधारण्यासाठी होमिओपॅथीचा वापर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
कुठल्याही आजारावरील उपचारांसाठी सुरुवातीपासूनच होमिओपॅथीची मदत घेतल्यास, त्याचे सकारात्मक परिणाम रुग्णांवर दिसून येतील. कोरोना काळात होमिओपॅथी उपचार अत्यंत प्रभावी ठरलेत. कोरोनानंतर उदभवलेल्या आजारांवरदेखील होमिओपॅथी प्रभावी ठरत आहे. त्यामुळे रुग्णांनी होमिओपॅथी उपचारांना प्राधान्य द्यायला हवे. – डॉ. पराग पटणी, होमिओपॅथी तज्ज्ञ.
हेही वाचा:
- महिलांना तात्पुरत्या नव्हे, कायमस्वरूपी नियुक्त्या द्या; सुप्रीम कोर्टाने तटरक्षक दलाला खडसावले
- Crime News : अखेर पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पतीस अटक..
- धक्कादायक! पोटच्या मुलीने प्रियकराच्या मदतीने संपविले आईला; अशी घडली घटना
The post जागतिक होमिओपॅथी दिन विशेष : आयुष विभागांतर्गत विशेष कॅम्प appeared first on पुढारी.