निमाणी बसस्थानकाचा पुनर्विकास प्रस्ताव रखडला; प्रवाशांचे हाल

निमाणी बसस्टॅण्ड pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य परिवहन महामंडळ व सिटीलिंकच्या वादात निमाणी बसस्थानकाच्या पुनर्विकासाची तब्बल ५० लाख रुपये खर्चाची योजना रखडली आहे. रेडीरेकनरनुसार भाडे आकारणीच्या वादात या बसस्थानकाची पुरती दुर्दशा झाली असून, प्रवाशांचे निवाराशेड पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, आगारात गुडघ्या एवढे खोल खड्डे पडल्याने बसेस मार्गक्रमण करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असल्याने प्रवाशांचेही हाल होत आहेत.

महापालिकेने नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या ‘सिटीलिंक-कनेक्टिंग नाशिक’च्या माध्यमातून ८ जुलै २०२१ पासून शहर बससेवा सुरू केली आहे. महापालिकेने बससेवा सुरू केली असली तरी नाशिक रोड व तपोवन डेपोवगळता शहरातील सर्व बसस्थानके राज्य परिवहन महामंडळाच्या मालकीची आहेत. या बसस्थानकांमध्ये सिटीलिंकच्या बसेस उभ्या करण्यासाठी महापालिका भाडे अदा करते. रेडीरेकनरच्या सहा टक्के दराने भाडे मिळावे यासाठी परिवहन महामंडळाचा तगादा आहे. पालिकेने बससेवेचा वाढता तोटा लक्षात घेत मोफत किंवा रेडीरेकनरच्या ०.५ टक्के दराने भाडे आकारणीची मागणी केली आहे. मात्र महामंडळाने ती मागणी पूर्णपणे फेटाळून लावल्यामुळे महापालिका आयुक्तांनी आता राज्य परिवहन महामंडळाकडे धाव घेतली आहे. मात्र भाडेदराच्या वादावर गेल्या दीड वर्षापासून तोडगा निघू शकलेला नाही. याचा फटका बसस्थानकांना बसला आहे. देखभाल दुरुस्ती होत नसल्यामुळे निमाणी बसस्थानकाची अक्षरश: दुरवस्था झाली आहे. या जागेसंदर्भात कोणताही करार पालिकेसोबत झालेला नसून दुसरीकडे, परिवहन महामंडळ जागेचा वापर होत नसल्यामुळे दुरुस्तीसाठी तयार नाही. त्यामुळे या ठिकाणी भले मोठे खड्डे व त्यात पाण्याची डबकी साचली आहेत. त्याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

महापालिकेची कोंडी!
तोट्यामुळे शहर बससेवा राज्य परिवहन महामंडळाने गुंडाळल्यानंतर महापालिकेला ती चालविण्यास भाग पाडले गेले. प्रतिमहा १० लाख याप्रमाणे वार्षिक एक कोटी २० लाख, तर भगूर व नाशिक रोड मिळून वार्षिक ५० लाख भाडे मिळण्याच्या मागणीवर परिवहन महामंडळ ठाम आहे.

निमाणी बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात प्रवाशांना मोठा त्रास होण्याची शक्यता असल्याने येत्या जून महिन्यात या बसस्थानकाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. – प्रदीप चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिटीलिंक.

हेही वाचा:

The post निमाणी बसस्थानकाचा पुनर्विकास प्रस्ताव रखडला; प्रवाशांचे हाल appeared first on पुढारी.