जीडीपीची ट्रेन सुसाट, पाच ट्रिलियन डॉलर्स लक्ष्याची तयारी

भारताची वाटचाल उच्च मध्यम उत्पन्न गटाकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  – भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) आर्थिक वर्ष 2023-24 तील जानेवारी-मार्च तिमाहीतील चौथ्या तिमाहीत 7.8 टक्क्यांवर झेपावले आहे. उत्पादन क्षेत्रात मजबूत वाढीमुळे जीडीपीने गती कायम राखत तेजीवाल्या दलालांसाठी आणखी एक मोठे गिफ्ट दिले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने दलाल स्ट्रीटच्या अंदाजांना मागे टाकले आणि पूर्ण वर्षासाठी 8.2 टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. सरकारच्या गत पाच वर्षांतील सकारात्मक धोरणांमुळे यावर्षी देशाच्या अर्थव्यवस्थेची गती आणखी मजबूत राहण्याची अपेक्षा केवळ भारतातीलच नव्हे तर अमेरिकेतील अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हा मुकूट भारतीय अर्थव्यवस्थेने कायम ठेवला आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने शुक्रवारी (दि. ३१ मे) सायंकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, क्षेत्रनिहाय विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, वास्तविक सकल मूल्यवर्धित उत्पादन (जीव्हीए) 2022-23 मधील 6.7 च्या तुलनेत 2023-24 मध्ये 7.2 टक्के दराने वाढले आहे. या वाढीमुळे भारतीय अर्थव्यवस्था 3.5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचली आहे. पुढील काही वर्षांत देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सचे लक्ष्य गाठू शकतो, असा विश्वास अर्थमंत्रालयाने व्यक्त केला आहे.

अर्थव्यवस्थेचा हा ढोबळ डेटा मंगळवारी (दि. 4 ) जाहीर होणाऱ्या 2024 च्या लोकसभा निवडणूक निकालाच्या तीन दिवस अगोदर आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वित्तीय वर्ष २०२४ मध्ये अर्थव्यवस्था आठ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा केली होती. गत ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत अर्थव्यवस्था 8.4 टक्क्यांनी वाढली आहे. गत सहा तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था सर्वात वेगवान गतीने वाढलेली आहे.

भारतासाठी मोठी बातमी : पनगरिया

अपेक्षित अंदाजानुसार, 2023-24 साठी जीडीपी वाढीच्या दराने आठ टक्क्यांचा टप्पा ओलांडला असून, अतिशय आरामात 8.2 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. भारतासाठी ही मोठी बातमी असल्याची प्रतिक्रिया सो‌ळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगरिया यांनी ट्विटरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. याउलट, काही अर्थतज्ज्ञांनी सध्याचे वस्तूंचे दर पाहता समाजातील बेरोजगार आणि गरीब वर्गांना लाभ मिळण्यासाठी अर्थव्यवस्थेचा वेग आणखी वाढणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.

अर्थव्यवस्थेने वेग पकडला : सुब्रमण्यम

सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार प्रो. कृष्णमूर्ती व्ही. सुब्रमण्यम म्हणाले की, 2014 पूर्वी भारतातील उत्पादकता वाढीचा दर 1.3 टक्के होता. 2014 नंतर तो 2.7 टक्के म्हणजेच दुप्पट झाला आहे. अजूनही काही टीकाकार आणि समीक्षक त्यांच्या वैचारिकदृष्ट्या जुन्याच विचारपद्धतीत अडकलेले आहे. परंतु आपल्या अर्थव्यवस्थेने वेग पकडला असल्याची टिप्पणी त्यांनी केली आहे. त्यांच्या मते विकासदराच्या आकेडवारीत काहीही चूक नाही. जीडीपी म्हणजे जीव्हीए आणि निव्वळ कर यांची बेरीज आहे. म्हणून, जीव्हीएमध्ये 7.2 टक्के आणि जीडीपीमध्ये 8.2 टक्के वाढ विश्वासार्ह आहे. जीव्हीए 7.2 टक्केसुद्धा चांगले आहे. निव्वळ करांमधील उच्च वाढ हा मजबूत आर्थिक कथेचा एक भाग आहे कारण गेल्या दशकभरात भारतातील निव्वळ करांची सरासरी वाढ 1.6 पट आहे. तर तिची सरासरी 1.8 पट एवढी आहे, याकडे सुब्रमण्यम यांनी लक्ष वेधले आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला हवा पुश

जीडीपी वाढीसाठी दोन घटकांनी मागील वर्षात अपेक्षेपेक्षा जास्त महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. एक म्हणजे २०२४ मध्ये दिसलेली घाऊक किंमत निर्देशांक अत्यंत कमी राहिल्याने वास्तविक आणि नाममात्र जीडीपीच्या वाढीमधील फरक कमी झाला आहे. ही चलनवाढ 3 टक्के किंवा त्याहून कमी झाल्यामुळे वास्तविक आणि नाममात्र जीडीपीतील फरक सरासरी पातळीवर परत आली आहे. दुसरे म्हणजे, कर संकलनातील चढ-उतार आणि अर्थसंकल्पीय सबसिडी पेआउट्सने देखील जीडीपीला वाढविण्यात मदत केली आहे. सरकारी गुंतवणूक अर्थव्यवस्थेला भक्कम आधार देत आहे. तर खासगी उपभोग खर्चामध्ये सापेक्ष कमकुवतपणा अजूनही कायम असून, तो सध्या चार टक्क्यांवरच रेंगाळलेला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था मागील वर्षात तुलनेने कमकुवत स्थितीत असल्याने सरकारला आता तिला गती द्यावी लागणार आहे. त्यामुळे सत्तेवर आलेल्या नवीन सरकारला ग्रामीण अथव्यवस्थेच्या गतीसाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.

अंदाजापेक्षा उत्तम कामगिरी

भारताच्या विकासदराने तज्ज्ञांना आश्चर्यचकित केलेले आहे. यंदा दुष्काळामुळे कृषी क्षेत्राची कामगिरी निराशाजनक झालेली असतानाही तात्पुरत्या अंदाजानुसार 2024 साठी भारताची जीडीपी वाढ 8.2 टक्के आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने फेब्रुवारीमध्ये २०२३-२४ मध्ये जीडीपी 7.6 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. परंतु या अंदाजापेक्षा चांगली कामगिरी अर्थव्यवस्थेने केली आहे.

अन्य देशांच्या तुलनेत सरस कामगिरी

जगातील अनेक प्रमुख जागतिक अर्थव्यवस्था तीव्र व्याजदरांमुळे मंदावलेल्या असताना, भारताच्या अर्थव्यवस्थेने जोरदार वाढ दाखविली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) ने 2024 अमेरिकेची अर्थव्यवस्था 2.7 टक्क्यांनी वाढेल, तर युरोझोन आणि चीनमध्ये अनुक्रमे 0.8 टक्के आणि पाच टक्के वाढ अपेक्षित आहे. या जागतिक मंदीच्या काळात, भारताच्या जीडीपीमधील निर्यातीचा वाटा २०२२-२३ मधील 23.9 टक्क्यांवरून २०२४ मध्ये 22.7 टक्क्यांवर घसरला. तथापि, ढोबळ स्थिर भांडवलनिर्मिती हा प्रमुख गुंतवणूक निर्देशक वार्षिक अंदाजे नऊ टक्क्यांनी वाढला आहे.

हेही वाचा: